महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा परत करणार; चंद्रहार पाटलांचा मोठा निर्णय
![Chandrahar Patil said that he will return both the maces of Maharashtra Kesari](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/02/Chandrahar-Patil-said-that-he-will-return-both-the-maces-of-Maharashtra-Kesari-780x470.jpg)
Chandrahar Patil | अहिल्यानगरमध्ये २ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र केसरी २०२५ स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरला. मात्र, यावेळी उपांत्य आणि अंतिम फेरीत मोठा गोंधळ पाहायला मिळाला. तसेच सामन्यानंतर पंचांशी हुज्जत घातल्याप्रकरणी पैलवान शिवराज राक्षे आणि पैलवान महेंद्र गायकवाड यांना कुस्तीगीर परिषदेने तीन वर्षांसाठी निलंबित केलं. यावरून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे.
चंद्रहार पाटील म्हणाले, की २००७ साली महाराष्ट्र केसरी होत असताना मी सांगली जिल्ह्याला २७ वर्षांनंतर मानाची गदा मिळवून दिली. अनेक वर्ष डबल महाराष्ट्र केसरी कोणीही नव्हतं. पण मला आणि सांगली जिल्ह्याला डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळाला. तसेच तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीसाठी मैदानात उतरणारा पैलवान मी होतो. आता ज्या प्रकारे शिवराज राक्षेवर पंचांनी अन्याय केला, शिवराज राक्षेला ज्या प्रकारे हरवण्यात आलं. त्याच प्रकारे मलाही तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होत असताना हरवण्यात आलं होतं.
हेही वाचा : स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेला मारहाण; इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत दिली माहिती
एका लाईव्ह कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे त्यावेळचे उपाध्यक्ष काकासाहेब पवार यांनी कबुली दिली की चंद्रहार पाटील यांच्यावर अन्याय झालेला आहे. तसेच संदीप आप्पा भोंडवे हे आज कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष आहेत. त्यांनी देखील कबुली दिली आहे की २००९ मध्ये चंद्रहार पाटील यांच्यावर अन्याय झाला. मग आता सर्वच पदाधिकाऱ्यांनी कबूल करावं की माझ्यावर अन्याय झालेला आहे. मग माझ्या मनाचं समाधान होईल, असं चंद्रहार पाटील म्हणाले.
आज मी कुठल्याही महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या स्पर्धा पाहायला जात नाही. माझ्यावर तेव्हा जो आघात झाला त्यामधून आजही मी बाहेर निघालेलो नाही. त्यावेळी पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे मला हरवण्यात आलं तेव्हा मी आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत होतो. मात्र, सहकार्यांच्या मदतीने मी त्यामधून बाहेर निघालो. मात्र, अशीच वेळ आज शिवराज राक्षेवर आलेली आहे. पंचांच्या एका चुकीच्या निर्णयामुळे शिवराज राक्षेचं आयुष्य बरबाद झालं. मलाही त्यामधून कुठेतरी बाहेर पडायचं आहे. त्यामुळे दोन दिवसांच्या आत सर्वांनी कबुली नाही दिली तर मी महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा परत करणार आहे, असं चंद्रहार पाटील म्हणाले.