breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

होळी आनंदात साजरी करा, मात्र नियम पाळूनच!

मुंबई – कोविड-१९ च्या संकटामुळे मागील वर्षापासून सर्वधर्मीय सण, उत्सव तसेच मोठ्या स्वरुपातील कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात आले आहेत. सध्या राज्यात तसेच मोठ्या शहरांमध्ये रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने एकत्रित येऊन उत्सव साजरा करणे योग्य होणार नाही. त्यामुळे यावर्षी होळी, धूलिवंदन व रंगपंचमीचा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन शासनाने केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला होळी आणि धुळवडीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. ‘परस्परांची आणि पर्यावरणाची काळजी घेत येणारे होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करावेत. सण-उत्सवाचा आनंद हा परस्परांविषयी, निसर्गाविषयी आदर वाढवण्यासाठी असतो. या सणांकडून प्रेरणा घेऊन कोरोना विषाणूला रोखण्याच्या नियमांचे काटेकोर पालन करूया’, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

वाचा :-मुंबईत 6,123, पुण्यात 6,591 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

तसेच मुंबई महापालिकेकडून होळी, धुळवड सण सार्वजनिकरीत्या साजरा करण्यास मनाई करण्यात आली आहे. पालिकेने दोनच दिवसांपूर्वी तसे आदेश जाहीर केले आहेत. त्याचबरोबर धुळवडीला सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेऊन पालिकेने निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक विभागात पाच पथके तैनात केली आहेत. ही पथके फिरतीवर राहतील व तपासणी करतील, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. एखाद्या ठिकाणी नियमभंग होतो आहे असे आढळले तर समज दिली जाईल. मात्र त्यानंतरही लोकांनी ऐकले नाही तर पोलिसांची मदत घेतली जाईल व कारवाई केली जाईल, असा इशाराही पालिका प्रशासनाने दिला आहे.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे संसर्ग रोखण्यासाठी होळीनिमित्त नागरिक एकत्र येण्याच्या शक्यतेने शहरात सर्वत्र पोलिसांकडून बंदोबस्त ठेवला जाणार आहे. शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी, गस्त ठेवली जाणार असून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणी होळी साजरी करू नये यासाठी पोलिसांनी नागरिकांना सूचना दिल्या आहेत. पोलिसांकडून वस्त्या, सोसायटीमध्ये फिरून नागरिकांना यासंबंधी आवाहन केले आहे. सध्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सोसायट्यांमध्येही सार्वजनिकरीत्या होळीचा सण साजरा करता येणार नाही, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. नागरिकांना खासगी होळी पूजन करता येईल. मात्र त्या ठिकाणी चारपेक्षा अधिक लोक एकत्र आल्यास कडक कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button