लॉकडाऊनच्या विरोधात व्यापारी वर्ग आक्रमक, तत्काळ तोडगा न काढल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा
![State Government's major decision on home vaccination; Will not depend on the center!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/cm-uddhav-thackeray.jpg)
मुंबई -कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्यामुळे राज्यातील लॉकडाऊन पुन्हा एकदा १ जूनपर्यंत वाढवण्यात आलाआहे. ठाकरे सरकारच्या या निर्णयामुळे व्यापारी वर्ग आक्रमक झाले असून सरकारने तात्काळ तोडगा न काढल्यास आम्ही न्यायालयात जाऊ असा इशारा फेडरेशन ऑफ रिटेल वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शहा यांनी दिला आहे.ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
लॉकडाऊनच्या काळात ई-कॉमर्स कंपन्या सुरू आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व वस्तुंची ऑनलाईन विक्री सुरु आहे. अशाप्रकारे कायद्याची पायमल्ली होत असताना सरकार गप्प का? नियम हा सर्वांसाठी समान असला पाहिजे, असे विरेन शहा यांनी म्हटले. त्यामुळे आता ठाकरे सरकार यावर काय निर्णय घेणार, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
गेल्या महिनाभरापासून राज्यात सुरु असलेल्या लॉकडाऊनविरोधात आता व्यापारी समाज आक्रमक होण्याची शक्यता आहे. गेल्या 40 दिवसांपासून दुकाने बंद आहेत. यामध्ये व्यापाऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता ठाकरे सरकारने काहीही करून महाराष्ट्र अनलॉक केलाच पाहिजे, अशी मागणी विरेन शाह यांनी बुधवारी केली होती.
गेल्या 40 दिवसांपासून दुकाने बंद आहेत. या काळात राज्य सरकारला आरोग्य सेवा सुरळीत करण्यासाठी बराच वेळ मिळाला आहे. 40 दिवसांमध्ये व्यापाऱ्यांचे तब्बल 50 हजार कोटींचे नुकसान झाले आहे. ठाकरे सरकारच्या ‘मुंबई मॉडेल’ची देशभरात चर्चा होते. आता राज्यातील रुग्णसंख्या कमी झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारने सगळं काही अनलॉक केलंच पाहिजे, असा युक्तिवाद शाह यांनी केला होता. मात्र, त्यानंतरही राज्य सरकारने 31 मेपर्यंत लॉकडाऊनचे निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता.