देवदर्शनासाठी भीमाशंकरला जाणाऱ्या बसला आग, जीवितहानी नाही !
पुणे । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
भिवंडी येथील पाया गावातून भाविक भिमाशंकर येथे देवदर्शनासाठी जात असताना त्यांच्या मिनी बसला अचानक आग लागली. ही घटना आज (दि.11) रात्री साडे अकरा वाजता घोडेगाव ते भिमाशंकर जाणारे रोडवर शिंदेवाडी येथे घडली. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
याप्रकरणी मिनीबस (MH 05 DK 9699) चालक बाबू बसप्पा सुरपुर (वय 30, रा.कल्याण डोंबिवली) यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात वर्दी दिली होती.
भिंवडी येथील पाया गावातील एकुण 27 प्रवासी घेऊन ही बस भिमाशंकर येथे देवदर्शनाकरीता निघाली होती. सकाऴी साडे सहाच्या सुमारास घोडेगाव हद्दीत घोडेगाव ते भिमाशंकर जाणाऱ्या रोडवर शिंदेवाडी येथे मिनीबसने अचानक पेट घेतला. त्यावेळी चालक व बसमधील प्रवासी खाली तातडीने उतरले. त्यामुळे जीवितहानी टळली. यावेळी 112 या आपत्कालीन क्रमांकाला माहिती दिली असता घटनास्थळी घोडेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस तेथे आले व त्यांनी लोकांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु, आग विझली नाही. यात मिनीबस जळून खाक झाली. गाडीसोबत प्रवाशांच्या असलेल्या बॅग तसेच गाडीचे मूळ कागदपत्रे जळून गेले. घोडेगाव पोलिसांनी पंचनामा केला असून घटनेची नोंद करून घेतली आहे.




