शरद पवारांच्या दौऱ्यात भाजप-मनसे आक्रमक; हनुमान चालीसाचं करणार पठण
![BJP-MNS aggressive during Sharad Pawar's tour; Hanuman will recite Chalisa](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/BJP-MNS-aggressive-during-Sharad-Pawars-tour-Hanuman-will-recite-Chalisa.jpg)
औरंगाबाद | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उद्या जालना येथील एका कार्यक्रमासाठी हजेरी लावणार असून रात्रीचा मुक्काम त्यांनी औरंगाबादच्या एका हॉटेलमध्ये केला आहे. एकीकडे शरद पवार शहरात आहे तर दुसरीकडे मनसे आणि भाजपकडून औरंगपुऱ्यातील दक्षिण मुखी हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पठण केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
शरद पवार यांचे शुक्रवारी सायंकाळी औरंगाबादेत आगमन झाले. जळगावचा कार्यक्रम आटोपल्यानंतर मुक्कामासाठी ते शहरात दाखल झाले. तर नियोजित दौऱ्यानुसार जळगावचा कार्यक्रम आटोपून मुक्कामासाठी पवार हे जालन्याला जाणार होते. परंतु आता ते आज ( १६ एप्रिल ) रोजी सकाळी जालन्याकडे रवाना होतील. विशेष म्हणजे मुंबईतील पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहर पोलिसांकडून पवारांच्या मुक्कामस्थानी तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच त्यांच्या जालना येथील कार्यक्रमासाठी सुद्धा पोलिसांकडून चोख बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.
मनसे-भाजपकडून हनुमान चालीसा…
शरद पवार शहरात मुक्कामाला असताना दुसरीकडे, मनसे आणि भाजपकडून शहरातील औरंगपुऱ्यातील दक्षिण हनुमान मंदिरात हनुमान चालीसाचे पठण करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी याबाबत मनसेला १४९ प्रमाणे नोटीस देत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपण जबाबदार असणार अशी तंबी दिली आहे.