भाजपा मुख्यमंत्री शिंदे यांच्या पाठीशी भक्कम, नाना तुम्ही मशालीची चिंता करा : चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला
![BJP is strong with Chief Minister Shinde, Nana you worry about Mashali: Chandrasekhar Bawankule's team](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/WhatsApp-Image-2022-10-13-at-10.24.37-AM-780x470.jpeg)
गोंदिया : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वासाठी मंत्रिपद सोडून उठाव केला. त्यांच्या पक्षासोबत भारतीय जनता पार्टीची युती असून भाजपा शिंदे यांच्या पाठीशी ताकदीने उभा आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांची काळजी करण्यापेक्षा मशालीची आणि पंजाची चिंता करावी, असा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रेशखर बावनकुळे यांनी बुधवारी लगावला.
ते गोंदिया येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी खासदार सुनील मेंढे, खासदार अशोक नेते, आमदार परिणय फूके, भाजपा गोंदिया जिल्हाध्यक्ष केशवराव मानकर, आमदार विजय रहांगडाले, माजी आमदार गोपल अग्रवाल आणि संजय पुराम उपस्थित होते.
मा. नाना पटोले यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला मिळालेल्या चिन्हावरून टिप्पणी करताना भाजपाची तलवार चालविणे हेच शिंदे गटाचे चिन्ह अशी टीका केली आहे. त्याबद्दल एका पत्रकाराने प्रतिक्रिया विचारली असता मा. प्रदेशाध्यक्षांनी वरील मत व्यक्त केले.
मा. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आमची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना या पक्षासोबत युती आहे. आमच्या उमेदवाराच्या विजयासाठी जेवढी ताकद लाऊ त्यापेक्षा अधिक ताकदीने युतीतील पक्षाच्या उमेदवारासाठी काम करू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आम्ही एक आहोत. नाना पटोले यांनी आमची काळजी करू नये. तुम्ही मशालीची, पंजाची आणि घडाळ्याची चिंता करा. कमळ आणि ढाल – तलवार हे दोन्ही मिळून तुम्हाला अशी जागा दाखवू की २०२४ च्या निवडणुकीत महाविकास आघाडीला लढण्यासाठी उमेदवारही मिळणार नाहीत.
ते म्हणाले की, आम्ही लोकशाहीवादी कार्यकर्ते आहोत. लोकशाहीच्या चौकटीत संसदीय शब्दांचा वापर करून केलेली टीका सहन करतो. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात थोडी जरी टीका केली तरी त्या व्यक्तीला तुरुंगात पाठविण्याची आमची संस्कृती नाही. पण आमच्या सहनशक्तीला मर्यादा आहे. चौकट ओलांडून कोणी टीका टिप्पणी केली तर आम्ही सहन करणार नाही.
त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व जगाने मान्य केले आहे. त्यांना देशातील जनतेने दोनवेळा लोकसभा निवडणुकीत बहुमत दिले आहे. त्यांच्याबद्दल जनतेत आदर आहे. नाना पटोले यांनी आपली पातळी ओळखून बोलावे. मानसिक संतुलन ढळल्याप्रमाणे नाना पटोले हे दररोज मा. मोदी यांच्याविरोधात बोलतात. पटोले यांनी त्यांचे वर्तन सुधारले पाहिजे. आगामी निवडणुकीत भाजपा त्यांना त्यांच्या मतदारसंघात पराभूत करेल.