अचलपूर दंगलीतील आरोपींचा भाजपने केला जाहीर सत्कार, अनेकांना पक्षामध्येही प्रवेश
![अचलपूर दंगलीतील आरोपींचा भाजपने केला जाहीर सत्कार, अनेकांना पक्षामध्येही प्रवेश](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/अचलपूर-दंगलीतील-आरोपींचा-भाजपने-केला-जाहीर-सत्कार-अनेकांना-पक्षामध्येही-प्रवेश.jpg)
अमरावती : अमरावती जिल्ह्यातील परतवाडा इथल्या एका सभागृहात काल भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी झेंडा काढण्याच्या वादातून निर्माण झालेल्या दंगलीतील आरोपींचा जाहीर कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. इतकंच नाहीतर पुढील निवडणुका भाजप हिंदुत्वाच्या मुद्यावरच लढवणार अशी चर्चाही सभागृहात रंगली. परतवाडा इथं आयोजित कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी सत्कार केला. यावेळी आयोजित जाहीर कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी शहराध्यक्ष अभय माथने, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण तायडे प्रताप अभ्यंकर, महिला शहराध्यक्ष नयना जोशी यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. यावेळी अनेकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.
अचलपूर दंगलीतील आरोपींना भगवा दुपट्टा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी म्हणाल्या की, अचलपूर पुरातत्व विभागाच्या वास्तूवर अनेक धर्माचे झेंडे लागतात. भगवा ध्वज लागला की अनेकांच्या जिव्हारी येतं. या दंगलीत सर्व हिंदू आरोपींना जेरीस आणा, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा असे आदेश राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले होते अशी टीका सुद्धा त्यांनी केली. जिल्हाध्यक्ष चौधरी पुढे म्हणाल्या की, सध्याचा काळ हिंदूंसाठी धोक्याचा आहे. अनेक लोकांवर आरोप नसतानाही गुन्हे दाखल होत आहेत. आम्ही आता जशास तसे उत्तर देऊ. मागच्या अनेक वर्षापासून राज्यमंत्री बच्चू कडू आमदार आहे. मात्र, अचलपूर विकास खुंटला असून अचलपूर भकास होत आहे, अशी टीका यावेळी त्यांनी केली.