‘जलआक्रोश मोर्चात भाजपने पैसे देऊन लोकांना आणले’; काँग्रेस आमदाराचा भाजपवर गंभीर आरोप
!['जलआक्रोश मोर्चात भाजपने पैसे देऊन लोक आणले'; काँग्रेस आमदाराचा गंभीर आरोप](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/जलआक्रोश-मोर्चात-भाजपने-पैसे-देऊन-लोक-आणले-काँग्रेस-आमदाराचा-गंभीर.jpg)
जालना : जालन्यातील पाणी प्रश्नावर भाजपच्या वतीने आज माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या नेतृत्वाखाली आज नगर पालिकेवर जलआक्रोश मोर्चाचे (Jal Aakrosh Morcha) काढण्यात आला. यावेळी मोर्चात मोठ्या संख्येने महिला रिकामे हंडे घेऊन सहभागी झाल्या होत्या.
भाजपने जालन्यामध्ये आयोजित केलेल्या जलआक्रोश मोर्चाची चर्चा राज्यभरात होत असली, तरी या मोर्चावर काँग्रेसचे जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी जोरदार टीकास्त्र सोडत गंभीर आरोप केला आहे. भाजपचा जल आक्रोश मोर्चा हा निव्वळ विनोद असून या मोर्चात लोकांना पैसे देऊन बोलावण्यात आले होते, असा गंभीर आरोप आमदार गोरंट्याल यांनी केला आहे. हा मोर्चा जालन्यामधील पाण्याच्या प्रश्नावर असताना या मोर्चाला लोक मात्र जालन्याच्या बाहेरील बोलावण्यात आली होती. हा एक प्रकारचा विनोद असल्याचे म्हणत त्यांनी भाजपच्या जल आक्रोश मोर्चाची खिल्ली उडवली.
ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने गोंधळ
गोरंट्याल यांनी भाजपवर पैसे देऊन मोर्चाला लोक आणल्याचा गंभीर आरोप केलेला असतानाच एका ऑडिओ क्लिपमुळे जालन्यात चर्चेला उधाण आले होते. जालन्यामध्ये सोशल मीडियात एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून या क्लिपमध्ये एक व्यक्ती एका महिलेला दोनशे रुपये देऊन महिला पाठवण्याच्या सूचना करत असल्याचे ऐकायला मिळत आहे. ही क्लिप काही वृत्त वाहिन्यांनी प्रसारित केली असून ही ऑडिओ क्लिप भाजपच्या जल आक्रोश मोर्चाशी संबंधित आहे का? किंवा हा कोणीतरी खोडसाळपणा केला आहे का, हे मात्र स्पष्ट होऊ शकलेले नाही.
काय आहे ऑडिओ क्लिपमध्ये?
व्हायरल झालेल्या या ऑडिओ क्लिप मध्ये सुरुवातीला एक महिला एका महिलेला विचारते तुम्ही किती बायका आणू शकता?. त्यावर आपण ५० महिला आणू शकतो असे उत्तर येते. मात्र या महिलांना ताबडतोब आणावे लागेल असे पलिकडून सांगितले जाते. काम काय असे विचारल्यावर ती महिला कार्यकर्ती सांगते की, मामा चौक येथून मोर्चा निघणार आहे, त्यात सामील व्हायचे आहे. तसेच पैसे किती मिळणार असे विचारल्यावर ती महिला कार्यकर्ती म्हणते की, आम्ही प्रत्येकीला २०० रुपये देऊ, असे सांगून कुठे जमायचे ते लवकरच कळविते असे म्हणून फोन कट केला जातो.