भाजप आणि शिवसेना आमने-सामने; गुलाबराव पाटलांची खासदारांवर टीका
![BJP and Shiv Sena face to face; Gulabrao Patil criticizes MPs](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/BJP-and-Shiv-Sena-face-to-face-Gulabrao-Patil-criticizes-MPs.jpg)
जळगाव | भाजपचे खासदार उन्मेश पाटील यांनी जिल्ह्यातील भारनियमनाच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली होती. या टीकेला आता मंत्री गुलाबराव पाटील यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘हा पठ्ठा नसता तर तो दिल्लीच्या दरवाजावर गेला नसता, खासदार झाला नसता,’ असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
जळगाव शहरात सार्वजनिक उत्सव समितीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बाबासाहेबांना अभिवादन केल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील पत्रकारांशी बोलत होते. जळगाव शहरातील शेतकऱ्यांचे वीज भारनियमन बंद करावं, या मागणीसाठी महाआक्रोश मोर्चा भाजपकडून काढण्यात आला होता. या आक्रोश मोर्चाच्या सभेत खासदार उन्मेश पाटील यांनी गुलाबराव पाटील यांचे जिल्ह्याकडे लक्ष नाही, पालकमंत्री झोपा काढत आहेत का? असा सवाल करत टीका केली होती. या टीकेनंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी उन्मेश पाटील चांगलाच समाचार घेतला आहे.
‘केंद्राकडून कोळसा देण्यात येत नसल्यामुळे राज्यात वीजेचा तुटवडा जाणवत आहे आणि त्यामुळेच भारनियमन केलं जात आहे. भाजपला जर खरंच शेतकऱ्यांच्या मागण्या समजत असतील, तर त्यांनी केंद्राला मुबलक प्रमाणात कोळसा पुरवण्यास सांगावं, समस्या आपोआपच सुटेल. भाजपने काल जळगावात मोर्चा काढला, खासदार येथे ओरडण्यापेक्षा जर दिल्लीत ओरडले असते आणि कोळसा आणला असता तर त्यांचा जाहीर सत्कार केला असता. मात्र जखम डोक्याला अन् मलम मांडीला याप्रमाणेच भाजपकडून चुकीचं वागणं सुरू आहे. केंद्राने कोळसा पुरवठा केल्याशिवाय राज्यातील भारनियमन हे कमी होऊ शकत नाही,’ असा दावा गुलाबराव पाटील यांनी केला आहे.
दरम्यान, खासदार उन्मेश पाटील हे माझ्यावर टीका केल्याशिवाय मोठे होऊ शकत नाही आणि ते माझ्यामुळेच खासदार झाले आहेत, असा टोलाही गुलाबराव पाटील यांनी लगावला.