मोठी बातमी : महाविकास आघाडी अडचणीत येण्याची शक्यता; काँग्रेसच्या २५ आमदारांनी उचललं ‘हे’ पाऊल!
![Big news: Mahavikas Aghadi likely to get in trouble; 25 Congress MLAs take 'this' step!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/Mahavikas-Aghadi-महाविकास-आघाडी-अडचणीत-येण्याची-शक्यता-काँग्रेसच्या-२५.jpg)
मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सरकारमधील काही मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप आहेत. यावरून प्रमुख विरोधी पक्ष भाजपनं सरकारला चहुबाजूने घेरले आहे. दुसरीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्व काही आलबेल नाही, अशा चर्चा अधूनमधून ऐकायला मिळत आहेत. आता काँग्रेसच्या २५ आमदारांनीही नाराजीचा सूर आळवला आहे. इकॉनॉमिक्स टाइम्सच्या वृत्तानुसार, महाविकास आघाडीतील काँग्रेसचे आमदार स्वपक्षाच्या मंत्र्यांवर नाराज आहेत. या नाराज आमदारांनी काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेसचे काही मंत्री त्यांचे ‘गाऱ्हाणे’ ऐकून घेत नाहीत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पत्राद्वारे केल्याचे कळते.
महाराष्ट्र काँग्रेसच्या आमदारांनी पक्षाच्या मंत्र्यांबद्दल तक्रार केली आहे. आमच्या समस्या, तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. या आमदारांनी सोनिया गांधींना थेट पत्र लिहिलं असून, यामध्ये तुम्हीच हस्तक्षेप करावा, असा आग्रह धरल्याचे कळते. महाविकास आघाडीमधील मंत्री विशेषतः काँग्रेस पक्षाचे मंत्री त्यांच्या समस्यांकडे कानाडोळा करत असल्याचा उल्लेख त्यांनी पत्रात केला आहे. मतदारसंघात विकासकामे करायची आहेत, पण त्याच्या अंमलबजावणीसाठी केलेल्या विनंतीकडे मंत्री दुर्लक्ष करत असल्याने त्याचा परिणाम आगामी निवडणुकांमध्ये दिसून येईल, असे संबंधित आमदारांचे म्हणणे आहे. स्वाभाविकच पक्षाच्या कामगिरीवरही त्याचा परिणाम होणार आहे. पक्षाकडूनच आपले आमदार आणि नेत्यांच्या समस्या, तक्रारींकडे दुर्लक्ष झाले तर, निवडणुकांमध्ये पक्षाची कामगिरी चांगली कशी होईल, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
समन्वयाचा अभाव असल्याचे संकेत
पक्षामध्येच समन्वयाचा अभाव असल्याचे काँग्रेसच्या नाराज आमदारांनी सांगितल्याचे कळते. आपल्या मुद्द्यांची आणि प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी काँग्रेसच्या प्रत्येक मंत्र्याला मदतीसाठी तीन-तीन आमदार देण्यात आले असल्याची माहिती गेल्या आठवड्यातच मिळाली, असे एका आमदाराने सांगितले. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर काही महिन्यांतच अशा प्रकारचे आदेश नेतृत्वाकडून मिळाले होते. पण आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचण्यासाठी अडीच वर्षे लागली, असेही एका आमदाराने नमूद केल्याचे समजते. आपल्यासोबत कोणता मंत्री आहे हे अद्यापही आम्हाला ठाऊक नाही, असेही आमदारांचे म्हणणे आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे स्वतः आपल्या आमदारांच्या नियमित संपर्कात असतात. त्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. त्यांच्या आमदारांच्या मतदारसंघांसाठी निधीही देत आहेत. तसेच त्यांच्या समस्यांचे निराकारण करण्याकडे लक्ष देत आहेत. मात्र, काँग्रेसचे मंत्री असं काही करताना दिसत नाहीत. अशीच परिस्थिती राहिल्यास महाराष्ट्रात काँग्रेसची अवस्था खूप बिकट होईल, असेही काही आमदारांचे म्हणणे आहे.