भूपती आणि सतीश गद्दार, फडणवीसांसमोर आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांबाबत माओवादी संघटनेचा मोठा निर्णय

Mallojula Venugopalrao Surrender : महाराष्ट्रातील गडचिरोली व छत्तीसगडमध्ये अनेक माओवादींनी आत्मसमर्पण केले. माओवादी चळवळीतील वरिष्ठ माजी नेता मल्लोजुला वेणुगोपालराव ऊर्फ सोनू ऊर्फ भूपती आणि तक्कलापल्ली वासुदेव राव ऊर्फ सतीश ऊर्फ रूपेश यांच्यासह आठवडाभरात तब्बल 271 सशस्त्र माओवाद्यांनी गडचिरोली आणि छत्तीसगडमध्ये शरणागती पत्करली.
मात्र आता भूपती आणि सतीशसोबत आत्मसमर्पण करणाऱ्या जवळपास 271 माओवाद्यांना संघटनेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. याबाबत माओवाद्यांच्या केंद्रीय समितीने चारपानी पत्रक जारी करून या शरणागतीचे नेतृत्व करणारे भूपती ऊर्फ सोनू व रूपेश ऊर्फ सतीशला गद्दार घोषित करत त्यांना धडा शिकविण्याचे आवाहन केले आहे.
पत्रकात काय म्हंटले?
भूपती आणि रूपेश हे देशद्रोही असल्याचे तेलगू भाषेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात लिहिले आहे. जानेवारी महिन्यात भूपतीची पत्नी तारक्का हिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गडचिरोली पोलिसांसमोर शरणागती पत्करली होती. तेव्हापासूनच भूपती मुख्यमंत्री आणि पोलिसांच्या संपर्कात होता, असाही दावा पत्रकात करण्यात आला आहे.
डिसेंबर २०२० रोजी झालेल्या केंद्रीय समितीच्या बैठकीत भूपतीने चळवळीतील उणिवांवर बोट ठेवणारे दस्तऐवज सादर केले होते. ज्यात संघटनेच्या राजकीय आणि क्रांतिकारी भूमिकेवरच प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. परंतु केंद्रीय समितीने भूपतीचा दावा फेटाळून लावला होता. त्यामुळेच इतक्या मोठ्या संख्येने माओवाद्यांच्या शरणागतीच्या घटना घडल्या किंबहुना घडवण्यात आल्या, असा आरोपही पत्रकात करण्यात आला आहे.
हेही वाचा – ‘ऐसा कोई सगा नाही, जिसे भाजपने ठगा नाही, अजित पवार किस खेत की मूली’ : संजय राऊतांनी ‘फटाके’ फोडले
दोघांना योग्य वेळी योग्य शिक्षा दिली जाईल
आत्मसमर्पण करणारे भूपती आणि सतीशसारखे माओवादी नेते संधीसाधू आणि स्वार्थी होते. त्यांनी माओवाद्यांच्या अनेक दशकांच्या लढ्याशी गद्दारी केली. दोघांनी त्यांच्या समर्थकांसह पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आणि माओवाद्यांचे महत्त्वाचे शस्त्र सुद्धा पोलिसांच्या स्वाधीन केलं. दोघांना योग्य वेळी योग्य शिक्षा दिली जाईल. भूपती आणि सतीशला कोणत्याही स्थितीत माफ केलं जाणार नाही. मात्र त्यांच्यासोबत आत्मसमर्पण करायला गेलेले इतर नक्षली जर भविष्यात माओवाद्यांच्या संघटनेत परत येऊ इच्छित असले, तर त्यांना आम्ही परत घेऊ असंही या पत्रकात सांगण्यात आलं आहे.
मरणाला घाबरून कुणी सरकारला शरण जात असेल तर त्यांनी खुशाल जावे पण संघटनेचे शस्त्र सरकारकडे सुपूर्द करू नये, असे समितीचे म्हणणे आहे. संघटनेच्या काही नेत्यांनी आणि सदस्यांनी शरणागती पत्करली असली तरी पक्ष कधीही शरण जाणार नाही, असा दावाही पत्रकात व्यक्त केला आहे.
संघटना आणि जनतेशी केलेला विश्वासघात असून या दोघांनाही जनतेने धडा शिकवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. हे पत्रक अभय या नावाने प्रसिद्ध करण्यात आले आहे. विशेष म्हणजे शरणागती पत्करण्यापूर्वी भूपतीसुद्धा अभय या नावानेच प्रवक्ता पद सांभाळत होता.
हातात संविधान घेऊन शरण
भूपतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असतील तर शरणागती पत्करु, अशी अट घातली होती. त्यामुळे सोलापूरचा विमानप्रवास टाळून मुख्यमंत्र्यांनी आपला मोर्चा गडचिरोलीकडे वळवला होता. देवेंद्र फडणवीस स्वत: उपस्थित असतानाच भूपती शरण आला. फडणवीसांनी स्वत: उपस्थित राहून भूपतीची इच्छा पूर्ण केली. भूपतीसोबत शरण आलेल्या त्याच्या अनेक साथीदारांनी हाती संविधानाची प्रत घेऊन पोलिसांसमोर शरणागती पत्कारली.
दरम्यान, मल्लोजूला वेणुगोपाल राव उर्फ सोनू उर्फ भूपती गेल्या 40 वर्षांपासून नक्षल चळवळीत सक्रिय होता. अनेक हिंसक हल्ल्यांचा तो सूत्रधार होता.




