वांद्रे स्कायवॉकचे लोकार्पण 26 जानेवारीला

मुंबई : रखडलेल्या वांद्रे स्कायवॉकची दखल मुंबई उच्च न्यायालयाने घेतल्यानंतर कामाला गती मिळत अखेर हा प्रकल्प पूर्णत्वास गेला असून 26 जानेवारीपासून तो पादचाऱ्यांसाठी खुला करण्यात येणार आहे. यामुळे रस्त्यावरील गर्दी टाळून थेट कलानगरपर्यंत पोहोचणे पादचाऱ्यांना शक्य होणार आहे.
वांद्रे पूर्व येथे म्हाडा, एमएमआरडीए, कुटुंब न्यायालय, लघुवाद व दंडाधिकारी न्यायालय, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अशी महत्त्वाची कार्यालये रेल्वे स्थानकापासून जवळच्या अंतरावर आहेत. या कार्यालयांत तसेच वांद्रे-कुर्ला संकुल या व्यावसायिक केंद्रात दररोज हजारो नागरिक ये-जा करतात.
हेही वाचा –युरोपियन युनियनने म्हणाले, ‘भारताशिवाय आम्ही अपूर्ण’ ; मेगा डीलची तारीख ठरली
रेल्वे स्थानकापासून जवळ असणाऱ्या कार्यालयांपर्यंत पायी जाण्याकडे त्यांचा कल असतो. मात्र रेल्वे स्थानकाच्या बाहेर अनधिकृत रिक्षांची प्रचंड गर्दी असते. तसेच स्थानकापासून ते पश्चिम द्रुतगती महामार्गापर्यंतच्या रस्त्यावर झोपडपट्टी आहे.
ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषणामुळे पादचाऱ्यांना बराच मन:स्ताप होतो. पूर्वी या भागात एक स्कायवॉक होता. मात्र त्याची दुरावस्था झाल्याने तो पाडण्यात आला. त्यानंतर गेले अनेक महिने नव्या स्कायवॉकचे बांधकाम सुरू होते. गेल्या वर्षअखेरीस हे काम पूर्ण झाले होते. मात्र आचारसंहितेमुळे त्याचे लोकार्पण करता आले नाही. या स्कायवॉकला दोन ठिकाणी सरकते जिनेही लावण्यात आले आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकातून थेट कलानगरपर्यंत पायी प्रवास करणे शक्य झाले आहे.




