अतुल भोसलेंच्या सहकार पॅनेलचा दणदणीत विजय; विश्वजीत कदम, पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का
![Atul Bhosale's co-operation panel won by a landslide; Big blow to Vishwajeet Kadam, Prithviraj Chavan](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/krue564yfiehrkget5_202107645275.jpg)
कराड – पश्चिम महाराष्ट्रातला सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना म्हणून ओळख असलेल्या कराडच्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सध्या चर्चेत आली होती. सहकारी साखर कारखान्यातल्या निवडणुकीत तिरंगी लढतीमुळे आणखी रंगत निर्माण झाली होती. या निवडणुकीचा निकाल आता जाहीर झाला आहे. काँग्रेस नेते आणि सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना धक्का देत डॉ. अतुल भोसलेंच्या सहकार पॅनेलने दणदणीत विजय मिळवला आहे.
काँग्रेस नेते आणि सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी इंद्रजीत मोहिते यांच्या रयत पॅनेलला पाठिंबा जाहीर केल्यानं सर्वत्र आता एकच चर्चा चालू झाली होती. गुरूवारी कराडच्या कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा मतमोजणीचा निकाल जाहीर झाला. डॉ अतुल भोसले यांच्या जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने सर्व 21 जागावर दहा हजारांच्या मताधिक्यानं मोठा विजय मिळवला आहे. यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची लढत तिरंगी असल्यानं मतदारांमध्ये चुरस निर्माण झाली होती. डॉ अतुल भोसले यांच्या या दणदणीत विजयानंतर मोठा जल्लोष साजरा केला जात आहे.
विश्वजीत कदम यांनी इंद्रजीत मोहिते यांच्या रयत पॅनेलला पाठिंबा जाहीर केला होता. कृष्णा कारखान्याला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी आपण रयत पॅनेलला पाठिंबा देत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. माजी चेअरमन अविनाश मोहिते आणि दुसरे माजी चेअरमन इंद्रजीत मोहिते यांना एकत्र आणण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विश्वजीत कदम यांनी प्रयत्न केले होते. परंतू त्यातही त्यांना अपयश आलं होतं.
दरम्यान, कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीनिमित्त कृष्णा सहकारी साखर कारखाना राजकारणाचा अड्डा बनवण्याचं षडयंत्र अनेक राजकारण्यांचं होतं ,असा आरोप डॉ. अतुल भोसले निवडणुकीनंतरही केला आहे. मात्र सुज्ञ सभासदांनी तो डाव उधळून लावला असून यापुढील काळात शेतकरी सभासदांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काम करणार आहे, असं डॉ. अतुल भोसले यांनी सांगितलं आहे. डॉ. अतुल भोसले हे महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे जावई आहेत.