पुण्यात महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्याला जाळण्याचा प्रयत्न, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
![Attempt to burn a female traffic police officer in Pune, accused in police custody](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/Pune-Police-780x470.jpg)
पुणे | पुण्यातील ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटनांनंतर आता पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाहन अडवल्याच्या कारणावरून पुण्यात एका महिला वाहतूक पोलिसाला भररस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी (ता. ५ जुलै) सायंकाळी सव्वापाचच्या दरम्यान शहरातील बुधवार चौकात ही घटना घडली. विश्रामबाग पोलीस ठाण्यात रात्री या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला पोलीस बुधवार चौकात वाहतुकीचे नियमन करीत होत्या. यावेळी एका वाहनचालकावर संशय आल्याने महिला पोलीस अधिकाऱ्याने वाहन अडवले. वाहन अडवल्याने वाहनचालक आणि महिला पोलिस यांच्यात वाद सुरू झाला. हा वाद विकोपाला त्याने बाटलीतील पेट्रोल महिला पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अंगावर टाकण्यास सुरूवात केली.
हेही वाचा – ‘आता फक्त दाऊदला क्लिनचीट देणं बाकी’; वायकरांना मिळालेल्या क्लिनचीटवरून संजय राऊतांचा टोला
सुदैवाने लायटर न पेटल्याने महिला पोलीस अधिकारी बचावल्या. या संपूर्ण प्रकाराने त्यांना धक्काच बसला होता. या संदर्भात विश्रामबाग पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आरोपीविरुद्ध कठोरात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.