शिर्डीतील साईबाबांच्या चरणी वर्षभरात तब्बल 400 कोटींचं दान
शिर्डीच्या साईचरणी यावर्षी सर्वाधिक दान
शिर्डी : शिर्डीतील साईबाबांच्या चरणी या वर्षी तब्बल 400 कोटींचं दान अर्पण करण्यात आलं आहे. साई समाधी मंदिराच्या देणगीत मागील वर्षाच्या तुलनेत कमालीची वाढ झाली आहे. दानपेटीत आज सर्व प्रकारच्या देणग्यांसह रोज एक कोटींहून अधिक दान येत आहे.
1 जानेवारी ते 26 डिसेंबर दरम्यान संस्थानला सर्व प्रकारात मिळून 394 कोटी 28 लाख 36 हजार देणगी मिळाली आहे. 31 डिसेंबर पर्यंतच्या देणगीसह हा आकडा चारशे कोटींचा विक्रमी टप्पा पार होईल. दक्षिणा पेटी 165 कोटी 55 लाख, देणगी कांऊटर 72 कोटी 26 लाख 27 हजार, डेबीट व क्रेडीट कार्ड 40 कोटी 74 लाख, ऑनलाईन देणगी 81 कोटी 79 लाख, चेक व डीडी 18 कोटी, 65 लाख व मनीऑर्डर 01 कोटी 88 लाख रुपये. याशिवाय सोने 25 किलो 578 ग्रॅम (11 कोटी 87 लाख), चांदी 326 किलो 38 ग्रॅम (01 कोटी 51लाख). यासोबतच, साईसंस्थानचे विदेशी चलन खात्याचा परवाना रिन्युएशन करणे प्रलंबित असल्याने कोट्यावधी रुपयांचे विदेशी चलन पडून आहे. दरवर्षी या माध्यमातूनही पंधरा ते वीस कोटी रुपयांची देणगी मिळत असते.
साई संस्थानची स्थापना 1922 झाली यावेळी भाविकांकडून 2238 रूपये वर्गणी आली तर कायम फंडासाठी 3709 रूपये जमा झाले. शंभर वर्षानंतर आज रोज एक कोटींपेक्षा अधिक दान येते व संस्थानच्या तिजोरीत जमा होत आहे. 470 कोटींच्या ठेवी, 430 किलो सोने व 06 हजार किलो चांदी आहे.
भाविकांकडून मिळालेल्या देणगीतून संस्थान विविध भक्तोपयोगी व समाजोपयोगी कामे करते. साईसंस्थानचे साईनाथ रूग्णालयात निशुल्क तर साईबाबा रूग्णालयात माफक दरात वैद्यकीय उपचार करण्यात येतात. मोठ्या आजारांसाठी गोरगरीब रूग्णांना वैद्यकीय अनुदान देण्यात येते. प्रसादालयात मोफत अन्नदान करण्यात येते. वर्षाकाठी जवळपास दीड कोटी भाविक याचा लाभ घेतात. संस्थानच्या शैक्षणिक संकुलात सहा हजार विद्यार्थी नाममात्र दरात ज्ञानार्जन करत आहेत. भाविकांना माफक दरात निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. राष्ट्रीय व नैसर्गिक आपत्तीतही संस्थान मदत करते. संस्थानात जवळपास सहा हजार कर्मचारी आहेत, असं साईसंस्थानचे प्रभारी मुख्यकार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी सांगितले.