कर्जाचा बोजा वाढताच, अतिवृष्टीने पिकांंचं नुकसान, परभणीत तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
![As the debt burden increases, crop damage due to heavy rains, suicide of a young farmer in Parbhani](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/As-the-debt-burden-increases-crop-damage-due-to-heavy-rains-suicide-of-a-young-farmer-in-Parbhani-1.png)
परभणी| शेतीसाठी घेतलेले कर्ज आणि अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाल्याने निर्माण झालेल्या आर्थिक तणावातून शेतकऱ्याच्या मुलाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना जिंतूर तालुक्यातील पिंपळगाव तांडा येथे घडली आहे. जयदीप रामनाथ चव्हाण (२८) असे मयत युवकाचे नाव आहे.
भोसी शिवारात रामनाथ चव्हाण यांना शेती आहे. या शेतीवर जिंतूर येथील एस.बी.आय. बँकेचे ५५ हजार रुपयांचे कर्ज, तसेच महिंद्रा फायनान्सचे २ लाख रुपयांचे गृह कर्ज आणि पेरणीसाठी घेतलेले हातउसने पैसे असे कर्ज आहे. अतिवृष्टीमुळे पिके आली नाहीत. त्यामुळे उत्पन्न मिळाले नाही. परिणामी घरी आर्थिक ताण-तणाव सुरू होते. याच तणावातून जयदीप चव्हाण याने आत्महत्या केल्याची माहिती रामनाथ चव्हाण यांनी दिली. त्यावरुन जिंतूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान जयदीप यांनी चुकीचे पाऊल उचलत आत्महत्या केल्यामुळे चव्हाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे