तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी मिलिंद नार्वेकरांची नियुक्ती; उद्धव ठाकरेंचा जगनमोहन रेड्डींना फोन
![Appointment of Milind Narvekar as a member of Tirumala Tirupati Devasthan Trust; Uddhav Thackeray calls Jaganmohan Reddy](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/Uddhav-Thackeray-Milind-Narvekar.jpg)
मुंबई |
आंध्र प्रदेश सरकारने देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थानम ट्रस्टच्या नव्या बोर्डाची स्थापना केली आहे. यामध्ये एकूण २८ सदस्यांचा समावेश आहे. राज्य सरकारकडून या सदस्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यामध्ये महाराष्ट्रातील एका व्यक्तीचाही समावेश आहे. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांचीदेखील ट्रस्टच्या सदस्यपदी नियुक्ती झाली आहे. राज्य सरकारने बुधवारी तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) ट्रस्टच्या नव्या बोर्डची स्थापना केली. यामध्ये २८ सदस्य असून चार पदसिद्ध सदस्यांचा समावेश आहे. देशभरातून २४ जणांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली असून मिलिंद नार्वेकरांचाही समावेश आहे.
तिरुमला तिरूपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी निवड केल्याबद्दल आंध्र प्रदेश सरकार तसेच मला ही संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांचा मी आभारी आहे. माझ्या हातून सेवा घडावी यासाठी देवानेच हे द्वार उघडले आहे. हे माझे भाग्य आहे.
— Milind Narvekar (@NarvekarMilind_) September 16, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याशी संवाद साधून मिलिंद नार्वेकर यांच्या नावाची शिफारस केल्याची माहिती आहे.
मिलिंद नार्वेकर यांच्याकडे मुंबई क्रिकेट संघटनेच्या मुंबई प्रीमिअर लीग (MPL) गव्हर्निंग कौन्सिलच्या अध्यक्षपदाची जबाबदारीदेखील आहे. गेल्या वर्षी त्यांची निवड करण्यात आली होती. मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंचे विश्वासू सहकारी आहेत. गटप्रमुख ते उद्धव ठाकरेंचे सचिव ते आता शिवसेना सचिव असा मिलिंद नार्वेकरांचा राजकीय प्रवास आहे.