मावळ लोकसभेसाठी आजपासून अर्ज स्वीकृती
मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चौथ्या टप्प्यात
![Election of Maval Lok Sabha Constituency in fourth phase](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/04/maval-780x470.jpg)
पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चौथ्या टप्प्यात होत असून आज (दि.१८ एप्रिल) रोजी निवडणुकीची सूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तेव्हापासून उमेदवारी अर्ज (नामनिर्देशन पत्रे) मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक कार्यालय, सातवा मजला, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, आकुर्डी या ठिकाणी स्वीकारले जातील, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली.
सिंगला म्हणाले, उमेदवाराला किंवा त्याच्या कोणत्याही सूचकाला निवडणूक निर्णय अधिकारी किंवा मावळ-मुळशीचे उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी यांच्याकडे गुरुवारपर्यंत (दि.२५) सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त कोणत्याही दिवशी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज दाखल करता येतील. सातवा मजला, बी विंग, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आकुर्डी येथे मावळ लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय स्थापित केले आहे. या ठिकाणी अर्जही मिळतील. २५ एप्रिल २०२४ रोजी नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची अंतिम तारीख आहे.