देवस्थान व वक्फ बोर्डाच्या जमीन घोटाळ्यात आणखी एक गुन्हा दाखल
बीड | प्रतिनिधी
बीड जिल्ह्यात देवस्थान आणि वक्फ बोर्डच्या जमीनी घोटाळा प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. महसूलमधील तत्कालीन बडतर्फ अधिकारी एन. आर. शेळकेसह मंडलाधिकारी, तलाठी व इतर ५ जणांचा या गुन्ह्यात समावेश आहे.
बीड जिल्ह्यात वक्फ बोर्डाच्या जमीनी मोठ्या प्रमाणावर असून घोटाळेबाज भूमाफियांनी त्या महसूल प्रशासन आणि मुतवल्ली यांच्याशी हातमिळवणी करून हडप केल्या. बीड शहरातील सारंगपूरा मस्जिदीच्या नावे असलेल्या २५ एकर ३८ गुंठे जमिनीला इनामदार रोशन अली यांनी ९९ वर्षांची लिज केल्याचे दाखवत दिनकर गिराम यांच्या नावे फेरफार घेण्यात आला होता. हे फेरफार रद्द करून वक्फ बोर्डाला ताबा द्यावा, अशी वक्फ बोर्डाने अनेकदा विनंती करूनदेखील ते फेरफार रद्द झाले नाहीत. उलट तत्कालीन उपजिल्हाधिकारी एन. आर. शेळके याने बेकायदेशीरपणे ही जमीन खासगी व्यक्तींच्या नावे खालसा केली. या प्रकरणात आता बडतर्फ करण्यात आलेला उपजिल्हाधिकारी एन. आर. शेळके याच्यासह मंडलाधिकारी पी. के. राख, तलाठी तांदळेसह भूमाफिया अशोक पिंगळे, श्रीमंत मस्के, सखाराम मस्के, सर्जेराव हाडूळे, उध्दव धपाटे यांचा समावेश आहे. दरम्यान, या सर्व आरोपींवर बीडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.