माईसाहेब सविता आंबेडकर यांच्यावर चित्रपटाची घोषणा
औरंगाबाद | प्रतिनिधी
माईसाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित माईसाहेब सविता आंबेडकर हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर खरेच विषप्रयोग झाला होता काय? या प्रश्नाचा शोध घेण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला जाणार आहे. यासंदर्भात मीराताई आंबेडकर यांची मुलाखत या चित्रपटात असेल. ॲड. बाळासाहेब आंबेडकर, रामदास आठवले, गंगाधर गाडे तसेच माईसाहेब यांचा सहवास लाभलेले विजय सुरवाडे व इतर मान्यवरांच्या मुलाखती या चित्रपटामध्ये असतील.
चा. भ. खैरमोडे, धनंजय कीर, सोहनलाल शास्त्री, नानकचंद रत्तू तसेच माईसाहेब लिखित ‘डॉ. आंबेडकरांच्या सहवासात’ या ग्रंथाचा तत्कालीन वर्तमानपत्रे, नियतकालिके, सरकारी अहवाल यांचा संदर्भ घेऊन या चित्रपटाची कथा तयार करण्यात आली आहे. डॉ. जब्बार पटेल यांचेही मार्गदर्शन घेण्यात येणार आहे. माहितीपट आणि चित्रपट या दोन्हींचा समन्वय साधून निर्मिती केली जाणार आहे. लवकरच तंत्रज्ञ आणि कलावंत यांची निवड केली जाणार आहे. या चित्रपटाचे निर्माते आणि लेखक प्रकाश त्रिभुवन आहेत.