एमपीएड व एमएड सीईटीच्या प्रवेश नोंदणीस सुरुवात

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी एमपीएड (शारीरिक शिक्षणशास्त्र) व एमएड (शिक्षणशास्त्र) या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सीईटीच्या अर्ज नोंदणीस ५ जानेवारीपासून सुरुवात करण्यात आली. ही नोंदणी २० जानेवारीपर्यंत ऑनलाईन होणार आहे. तसेच इतर अभ्यासक्रमाच्या सीईटी नोंदणीसही लवकरच सुरुवात होणार आहे.
एमपीएड व एमएड या दोन पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सीईटीपासून २०२६ च्या सीईटी नोंदणीस प्रारंभ झाला आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज, नोंदणी वेळापत्रक आणि माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या http://www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अभ्यासक्रमांसाठीची सीईटी महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर संगणकाधारित पद्धतीने, ऑनलाईन घेण्यात येणार आहे. मागील वर्षी या दोन अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश परीक्षेस ६ हजार १९३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. नोंदणी व परीक्षेसंदर्भातील अद्ययावत माहिती, तपशीलवार वेळापत्रक आणि परीक्षेशी संबंधित सूचनांसाठी विद्यार्थ्यांनी नियमितपणे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन सीईटी कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी केले आहे.
हेही वाचा – “विजयाचा शंखनाद… पिंपरीत भाजपचाच कौल!”
एम.पी.एड. सीईटीसाठी २० जानेवारीपर्यंत नोंदणी करता येणार असून, २४ मार्च रोजी सीईटी परीक्षा होणार आहे. त्याचप्रमाणष एम.पी.एड. फिल्ड टेस्ट (ऑफलाईन) ही परीक्षा २५ मार्च रोजी होणार आहे. एम.एड. अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठीही २० जानेवारीपर्यंत नोंदणी करता येणार असून २५ मार्च रोजी परीक्षा होणार आहे.
विद्यार्थ्यांची अचूक माहिती उपलब्ध व्हावी, तसेच त्यांची पडताळणी करणे सहज शक्य व्हावे यासाठी २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून राज्य सामाईक प्रवेश कक्षाने सीईटी नोंदणीसाठी ‘ऑटोमेटेड पर्मनंट अकॅडमिक अकाऊंट रजिस्ट्री (अपार) आयडी व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी युनिक डिसॲबिलिटी आयडी (युडीआयडी) बंधनकारक करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी सीईटीसाठी नोंदणी करताना अपार आयडी व युडीआयडीची नोंदणी करावी त्यावरून विद्यार्थ्यांची पडताळणी केली जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप त्यांचा अपार आयडी तयार केलेला नाही त्यांनी तो डिजीलॉकरद्वारे तयार करावा.




