संत तुकाराम महाराज संत विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया पुर्ण
![Admission process of Sant Tukaram Maharaj Sant University is complete](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/WhatsApp-Image-2023-02-17-at-3.45.45-AM-780x470.jpeg)
पिंपरी : भारतात असलेल्या शिक्षण पद्धतीवर पाश्चात्य संस्कृतीचा मोठा प्रभाव आहे. भारतातील शिक्षण पद्धतीची संरचना पाश्चात्य पद्धतीनेच करण्यात आलेली आहे. मात्र, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. मुलांवर चांगले संस्कार करावेत आणि समता,बंधुता, मानवता ही संतांनी शिकवलेली मुल्ये नव्या पिढीला कळावीत, या उद्देशाने संतपीठाची स्थापना करण्यात आली आहे. त्यातच आता प्राथमिक वर्गाच्या नर्सरीपासून सातवीपर्यंत वर्ग याठिकाणी सुरू करण्यात आले आहेत. 687 विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पुर्ण करण्यात आली आहे.
जगत् गुरू संत तुकाराम महाराज संत विद्यापीठ, स्कुल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज पाटीलनगर, टाळगाव चिखली येथील शाळेत शैक्षणिक वर्ष 2023-24 करिता प्रवेश प्रक्रियेसाठी अधिकचे अर्ज प्राप्त झाले होते. निर्धारित केलेल्या प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त अर्ज आल्यानंतर व्यवस्थापकांच्या सुचनेनुसार ही प्रवेश प्रक्रिया पारदर्शी पद्धतीने पार पाडण्यात आली.
15 फेब्रुवारीला विद्यार्थी प्रवेशाची सोडत पालकांच्या संमतीने आणि मान्यवर पालकांच्या हस्ते करण्यात आली. यावर्षी पुर्व प्राथमिक शाळेपासून सातवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. शिक्षणाचा चांगला दर्जा असल्याने पालकांचा चांगला प्रतिसाद भेटत आहे. शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी आलेल्या एकूण 1366 अर्जांपैकी 687 विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करण्यात आला आहे. जगद् गुरू संत तुकाराम महाराज संतविद्यापीठाची प्रक्रिया सोडत पद्धतीने पार पाडण्यात आली.
दरम्यान, या संतविद्यापीठाची स्थापना कंपनी कायदा 2013 नुसार करण्यात आली आहे. संत तुकाराम महाराज संतविदयापीठ अंतर्गत सुरू झालेले स्कुल अॅण्ड कॉलेज हे महाराष्ट्र स्वयं अर्थसहाय्यित तत्वावर चालविण्यात येत आहे. प्रवेशाच्या सोडत प्रक्रियेवेळी माजी स्वीकृत नगरसेवक संतोष मोरे, दिनेष यादव, संतविद्यापीठाचे संचालक राजू महाराज ढोरे, डॉ. स्वाती मुळे, संतविद्यापीठाच्या प्राचार्या मृदुला महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/image-33-1024x770.png)