महापालिकेला कर्जाच्या खाईत लोटण्याचे पाप प्रशासकांनी करू नये
५५० कोटी रुपयांचे कर्ज घेण्याची कार्यवाही त्वरित रद्द करण्याची संजोग वाघेरे पाटील यांची मागणी
![Administrators should not commit the sin of indulging in debt to the municipal corporation](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/02/Sanjyog-Waghere-780x470.jpg)
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेला कर्जाच्या खाईत लोटण्याचे पाप आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी करू नये. प्रशासनामार्फत सुरू करण्यात आलेली ५५० कोटी रुपयांचे कर्ज घेण्याची कार्यवाही त्वरीत रद्द करावी. अन्यथा या उधळपट्टी धोरणाविरुध्द व चुकीच्या निर्णयाविरुद्ध शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष रस्त्यावर उतरून प्रशासनाचा बुरखा फाडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मावळचे संघटक संजोग वाघेरे पाटील यांनी दिला.
संजोग वाघेरे पाटील यांनी म्हटले आहे की, महापालिकेची सत्ता नागरिकांना भुलथापा देऊन भारतीय जनता पक्षाने हस्तगत केली. त्यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात महापालिकेत स्मार्ट सिटी, अर्बन स्ट्रीटपासून असंख्य मोठ्या प्रकल्पाच्या नावाखाली पिंपरी-चिंचवडकरांच्या तिजोरीची लूट करण्यात आली. महापालिकेने मागील काळात राबविलेले अनेक प्रकल्प फसलेले आहेत. ते पुर्णत्वास गेलेले नाहीत.
त्यात महापालिका आयुक्त यांनी आर्थिक शिस्तीकडे दुर्लक्ष केले आहे. आयुक्त प्रचंड राजकीय दबावाखाली काम करत आहेत. महानगरपालिकेचे, पर्यायाने पिंपरी चिंचवड शहरातील करदात्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहात.
टीडीआर प्रकरणात घेतलेले निर्णय वादाच्या भोव-यात सापडले. या प्रकल्प स्थगित करण्याची वेळ आयुक्तांवर आली. चुकीचे निर्णय घेऊन या शहराला चुकीच्या दिशेने नेले जात आहे. महानगरपालिकेची आर्थिक बाजू भक्कम करण्याची जबाबदारी आयुक्त म्हणून आपल्यावर आहे. ती जबाबदारी आपण पार पाडत नसून कोणाच्या तरी हातचे बाहुले होऊन काम करत आहात. त्याचे चित्र आपल्या नव्याने कर्ज काढण्याच्या निर्णयावरून दिसत असल्याचे संजोग वाघेरे पाटील यांनी म्हटले आहे.