फुले वाडा स्मारकाच्या विस्तारीकरणास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रशासकीय मान्यता
![Administrative approval from Deputy Chief Minister Eknath Shinde for expansion of Phule Wada Memorial](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/Administrative-approval-from-Deputy-Chief-Minister-Eknath-Shinde-for-expansion-of-Phule-Wada-Memorial-780x470.jpg)
मुंबई | पुणे येथील महात्मा फुले वाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादन आणि रहिवाशांचे अन्यत्र पुनर्वसन करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. या कामांसाठी २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर असून प्रशासकीय मान्यता मिळाल्याने आता या स्मारकाच्या विस्तारीकरणाला अधिक गती मिळणार आहे.
पुणे शहरातील महात्मा फुले वाडा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या स्मारकांचे विस्तारीकरण करण्यासाठी भूसंपादन आणि रहिवाशांचे पुनर्वसन या कामांसाठी २०० कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आलेला आहे. स्मारकांच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादन रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात येणार असून त्यानंतर फुले वाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक या दोन्ही स्मारकांना जोडण्यासाठी रस्ता करण्यात येणार आहे. त्याचबरोबर दोन्ही स्मारकांचे जतन आणि विकास करण्यात येणार आहे. प्रशासकीय मान्यतेनंतर मंजूर निधी पुणे महापालिकेला वितरीत केला जाईल. यामुळे स्मारकांच्या कामाला गती मिळण्यास मदत होणार आहे.