पुणे-मुंबई महामार्गावर बाणेर परिसरात अनधिकृत फर्निचर शो रूमवर मोठी कारवाई
![Action taken against unauthorized furniture show rooms in Baner area on Pune-Mumbai highway](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/11/Pune-780x470.jpg)
पुणे : पुणे-मुंबई महामार्गावर बाणेर येथे अनधिकृतपणे थाटलेल्या फर्निचरच्या आलिशान दुकानांवर पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली. यामध्ये अनेक दुकानांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर बाणेर येथे महामार्गाच्या बाजूने अनधिकृतपणे अनेक फर्निचर दुकाने थाटण्यात आली आहेत. या दुकानांसाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. ही अनधिकृत दुकाने काढून घेण्यासाठी पुणे महापालिकेने त्या दुकानदारांना मागील काही दिवसांपूर्वी नोटीसा दिल्या होत्या. मात्र त्या नोटिसांना दुकानदारांनी केराची टोपली दाखवली होती.
हेही वाचा – १ डिसेंबरपासून बदलणार ‘हे’ नियम; तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
पुणे-मुंबई हायवे महामार्गावर बाणेर परिसरात अनधिकृत फर्निचर शो रूमवर मोठी कारवाई#pune pic.twitter.com/cpaHrZLVcX
— Vaishnav Sanjay Jadhav (@JVaishu88) November 30, 2023
गुरुवारी सकाळी पुणे महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे पथक पोलीस बंदोबस्तात फर्निचरच्या दुकानांसमोर हजर झाले. अतिक्रमण विभागाने फर्निचरच्या दुकानांवर थेट जेसीबी चालवून दुकाने जमीनदोस्त करण्यास सुरुवात केली. महापालिकेची कारवाई सुरु होताच अनेक दुकानदारांची पाचावर धारण बसली. काही दुकानदारांनी दुकानातील फर्निचर तत्काळ हटविण्याचे काम सुरु केले. तर काहींनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणत्याही दबावाला बळी न पडता ही कारवाई सुरु राहिली.