भुसावळ–पुणे दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेसचा प्रस्ताव…!

जळगाव : जिल्ह्यातील प्रवशांची वाढती मागणी लक्षात घेता भुसावळ–मुंबई आणि भुसावळ–पुणे स्वतंत्र एक्स्प्रेस सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाकडे यापूर्वीच सादर करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त भुसावळ–पुणे वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याच्या दृष्टीने विशेष प्रस्ताव सादर केल्याची माहिती केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी येथे दिली.
केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या असून, त्याचा थेट लाभ राज्यातील पायाभूत सुविधा, रेल्वे, पर्यटन आणि औद्योगिक विकासाला होणार आहे, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी शनिवारी जळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी भुसावळ–मुंबई तसेच भुसावळ–पुणे स्वतंत्र एक्स्प्रेस गाड्यांसंदर्भात दाखल करण्यात आलेल्या प्रस्तावांची सविस्तर माहिती दिली. भुसावळ–पुणे मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडे विशेष पाठपुरावा सुरू आहे. वंदे भारत एक्स्प्रेस एक्स्प्रेस प्रामुख्याने पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने सुरू केल्या जातात. त्या पार्श्वभूमीवर, जळगाव जिल्ह्यातील पर्यटन क्षमता लक्षात घेता भुसावळ–पुणे वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होण्यास कोणतीही अडचण नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई देवस्थान हे राज्यातील तसेच देशातील भाविकांसाठी श्रद्धास्थान आहे. त्याचप्रमाणे जळगाव शहरापासून जवळच असलेली आणि जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखली जाणारी अजिंठा लेणी, तसेच परिसरातील इतर पर्यटन स्थळे ही पर्यटकांसाठी मोठे आकर्षण ठरतात. या सर्व बाबींचा विचार करता भुसावळ–पुणे वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्यास पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास रक्षा खडसे यांनी व्यक्त केला. भुसावळ हे महत्त्वाचे रेल्वे जंक्शन असून खान्देश, विदर्भ व मराठवाडा या भागांना जोडणारा दुवा आहे. पुणे हे शिक्षण, उद्योग आणि आयटी क्षेत्राचे केंद्र असल्याने या दोन शहरांदरम्यान जलद व अत्याधुनिक रेल्वे सेवा सुरू होणे ही काळाची गरज आहे.
हेही वाचा – बारावी, दहावी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश…
वंदे भारत एक्स्प्रेसमुळे प्रवासाचा कालावधी कमी होऊन प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि आधुनिक सुविधा उपलब्ध होतील, असेही त्यांनी नमूद केले. केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेच्या पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर तरतूद करण्यात आली असून, नव्या गाड्या तसेच स्थानकांचे आधुनिकीकरण आणि प्रवासी सुविधांमध्ये सुधारणा यावर भर देण्यात आला आहे. याचा लाभ महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यालाही होणार असल्याचे खडसे यांनी सांगितले.
भुसावळ–पुणे वंदे भारत एक्स्प्रेससाठी आवश्यक ते सर्व प्रस्ताव व पाठपुरावा केंद्रस्तरावर सुरू आहे. त्यासाठी लवकरच सकारात्मक निर्णय अपेक्षित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी खासदार स्मिता वाघ, जळगावच्या नवनिर्वाचित महापौर दीपमाळा काळे, उपमहापौर मनोज चौधरी, आमदार सुरेश भोळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राधेश्याम चौधरी, चंद्रकांत बाविस्कर, दीपक सूर्यवंशी आदी उपस्थित होते.




