किशोर आवारेंच्या खुनाचा बदला घेण्याचा कट पोलिसांनी उधळला, पाच जणांना अटक
पिंपरी : जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांची १२ मे रोजी हत्या झाली. या हत्येचा बदला घेण्यासाठी एका टोळीने कट रचला. मात्र हा पिंपरी-चिंचवड पोलिसांनी उधळून लावला आहे. या प्रकरणी सांडभोर टोळीतील पाच आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून सात पिस्तूल, २१ जीवंत काडतूसे, लोखंडी कोयता, तलवार जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित जयप्रकाश परदेशी (वय ३१, रा. डोळसनाथ मंदिराशेजारी, तळेगाव दाभाडे), मंगेश भीमराव मोरे (वय ३०, रा. माळीनगर, वडगाव मावळ), अनिल वसंत पवार (वय ३९), अक्षय विनोद चौधरी (वय २८) आणि देवराज (रा. जळगाव) अशी अटक केलेल्याआरोपींची नावे आहेत.
हेही वाचा – ‘..तर प्रतिभाआजींना हा प्रश्न विचारला पाहिजे’; रोहित पवारांचं अजितदादांना प्रत्युत्तर
तळेगाव दाभाडे एसटी बस स्थानक परिसरातून सांडभोर टोळीचे प्रमुख प्रमोद सोपान सांडभोर आणि शरद मुरलीधर साळवी या दोघांना चार गावठी पिस्तुलासह अटक केली होती. त्यांची सखोल चौकशी केली असता किशोर आवारे यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी कट रचल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, जबरी चोरी, खंडणी, वाहनांची तोडफोड, जाळपोळ करणे असे २६ गुन्हे दाखल आहेत.
दरम्यान, जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची १२ मे रोजी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या आवारात भर दिवसा गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करत हत्या करण्यात आली. यातील काही आरोपींना पोलिसांनी अटक केली. मात्र या हत्येचा मुख्य सूत्रधार चंद्रभान उर्फ भानु खळदे अद्यापही फरार आहे.