करदात्यांसाठी नववर्षाचे ‘गिफ्ट’!
मालमत्ता असेसमेंट रजिस्टर ऑनलाईन : कर संकलन विभागाचा पुढाकार
![New Year's Gift for Taxpayers](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/01/PCMC-780x470.jpg)
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाच्या वतीने गेल्या दोन वर्षात मालमत्ता धारकांना घर बसल्या उच्च दर्जाच्या सुविधा देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहे. याच अनुषंगाने आता विभागाने मालमत्ता धारकांना नवीन वर्षानिमित्त डबल गिफ्ट दिले आहे. 1 जानेवारीपासून असेसमेंट रजिस्टर ऑनलाईन करण्यात आले आहे. यापुढे एक जानेवारीपासून होणाऱ्या सर्व नोंदी फक्त ऑनलाईन होतील. एक जानेवारीपासून मिळकत कर उतारा ऑनलाईन काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सध्या 6 लाख 15 हजार विविध मालमत्ता आहेत. या मालमत्ताधारकांना कर आकारणी व करसंकलन विभागामार्फत कराची आकारणी व वसूलीची कार्यवाही करण्यात येते. यासाठी 17 विभागीय करसंकलन कार्यालये कार्यरत आहेत.
मालमत्ता धारकांना विविध शासकीय कामांसाठी मालमत्ता कर उतारा लागतो. हा उतारा काढण्यासाठी यापूर्वी नागरिकांना प्रत्यक्ष कर संकलन कार्यालयात जावे लागायचे. त्यानंतर मालमत्ता आकारणी पुस्तकात उतारे शोधावे लागत होते. त्यानंतर हा उतारा हस्तलिखित स्वरूपात दिला जात होता. यासाठी विलंब लागत होता. आता 1 जानेवारीपासून सर्व प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे. 1 जानेवारीनंतर ज्यांची ऑनलाईन नोंदणी होणार आहेत त्यांना तो उतारा तत्काळ मिळेल. यासाठी नाममात्र असे 20 रूपये शुल्क भरावे लागणार आहे.
31 डिसेंबर 2023 पूर्वीच्या नोंदी नोंद वहीमध्ये नोंदविलेल्या असल्यामुळे संबंधित मालमत्ता धारकांना मालमत्ता उतारा या टॅबवर क्लिक केले की त्याचा तपशील संबंधित झोन कार्यालयाकडे वर्ग केला जाईल. त्यानंतर संबंधित गट लिपीक असेसमेंट रजिस्टरमधील त्या मालमत्तेच्या नोंदी काॅम्प्युटरमध्ये फिड करतील. त्यानंतर संबंधित मालमत्ता धारकांच्या ई-मेल आणि मोबाईलवर लिंक पाठविण्यात येईल. या लिंकवर क्लिक केले की दाखला मिळेल. अथवा महापालिकेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन दाखला मिळेल. त्यामुळे 1 जानेवारीपासून ऑफलाईन सुविधा बंद करण्यात येणार आहे.
मिळकत कर उतारा मिळवण्याची…अशी असेल प्रक्रिया
महापालिकेच्या संकेतस्थळावर जाऊन कर आकारणी व कर संकलन विभागाचा पर्याय निवडावा. यामध्ये मोबाईल क्रमांक किंवा मालमत्ता क्रमांक टाकला की त्यामध्ये वेगवेगळे पर्याय दिसतील. मालमत्ता कर उतारा हा पर्याय निवडावा. त्यानंतर फक्त क्लिक करा आणि मालमत्ता कर उतारा मिळवा. ही प्रक्रिया ओटीपी आधारित असल्याने नागरिकांना त्यांच्या मालमत्तेला आपला मोबाईल क्रमांक लिंक करावा लागणार आहे. आतापर्यंत जवळपास साडे चार लाख मालमत्तांना मोबाईल नंबर लिंक केलेले आहेत. उर्वरित मालमत्ता धारक यांनीही आपले मोबाईल नंबर आपल्या मालमत्तेला लिंक करण्याचे पालिकेने आवाहन केले आहे.
याच महिन्यात आम्ही पालिकेच्या कर संकलन विभाग आणि दुय्यम निबंधक कार्यालये यांच्या डेटाबेसचे इंटेग्रेशन करणार आहोत. त्यामुळे खरेदी खत, बक्षिसपत्र, इच्छापत्र याद्वारे मालमत्तांचे होणारे हस्तांतरण करण्यासाठी मालमत्ता धारकांना आता अर्ज करण्याची गरजही राहणार नाही. मालमत्तेच्या नावात तत्काळ बदल होणार आहे. दुसऱ्या बाजूला आम्ही एका वर्षात जुन्या सर्व अभिलेख जसे की असेसमेंट रजिस्टर, मालमत्तेची मूळ फाईल्स या सर्वांचे स्कॅनिंग आणि डीजिटायझेशन करणार आहोत आणि हे सर्व अभिलेख संबंधित मालमत्तेला जोडले जातील. त्यामुळे संबंधित मालमत्ता धारकाला त्याचे सर्व अभिलेख घर बसल्या एका क्लिकवर उपलब्ध होतील. पारदर्शी, गतिमान आणि जबाबदार प्रशासनाचा हा सर्वात महत्त्वाचा टप्पा असेल. याची अंमलबजावणी करणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही बहुधा देशातील पहिली महापालिका ठरेल.
-शेखर सिंह, आयुक्त.शहरात सध्या महापालिका आपल्या दारी अंतर्गत सर्वंकष मालमत्ता नोंदणी अभियान चालू आहे. मालमत्तांना लक्षात राहणारे सोपे आणि क्रमनिहाय मालमत्ता क्रमांक देणे, घरभेटी देऊन नोंदीसाठी आवश्यक अंतर्गत मोजणी करणे, मालमत्तेचे आराखडे जागीच उपलब्ध करून देणे अशी कामे करण्यात येत आहेत. या सगळ्यामुळे कर आकारणी व कर संकलन कामकाजात सुसूत्रता आणि सुलभता येणार आहे. सध्या मालमत्ता कर विभाग आणि पाणीपट्टी यांचे इंटेग्रेशन निविदा स्तरावर आहे. त्यामुळे नागरिकांना घरपट्टी आणि पाणीपट्टी वेगवेगळी भरण्याचा त्रास पण वाचणार आहे. पालिकेचा बांधकाम परवाना विभाग आणि मालमत्ता कर विभाग यांचे पण इंटेग्रेशन अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळाला की लगेचच कर आकारणी होणार आहे. त्यासाठी नागरिकांना आता वेगळे अर्ज, कार्यवाही करण्याची गरज राहणार नाही.
-प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त.माननीय आयुक्त शेखर सिंह यांचे व्हिजन आणि माननीय अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कर संकलन विभाग हायटेक करण्याचे काम वेगाने चालू आहे. विभाग आधुनिक करत असताना त्याचा अंतिम फायदा मालमत्ता धारकांना होणे, त्यांची कामे सुलभ आणि जलद गतीने होणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. आमच्या कुठल्याही उपक्रमाचा केंद्रबिंदू हा अंतिमतः शहरातील नागरिक राहील याची आम्ही दक्षता घेत आहोत.
-नीलेश देशमुख, सहायक आयुक्त.