चेंबूरमध्ये अग्नितांडवात 7 जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री शिंदेंकडून 35 लाखांच्या मदतीची घोषणा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/10/PUNE-10-780x470.jpg)
मुंबई : उपनगरातील चेंबूर परिसरात असलेल्या सिद्धार्थनगर येथे आज आगीची अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे. गुप्ता परिवारातील सात लोकांचा यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर दोन लोक जखमी झाले आहेत. या घटनेने गुप्ता परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या परिवारातील बेनीलाल गुप्ता यांची मी आज भेट घेतली आहे. या झालेल्या घटनेची चौकशी केली जाईल आणि योग्य तो निर्णय देखील घेण्यात येईल. सरकार या पीडित कुटुंबासोबत असून मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक मयताला पाच लाख रुपये, अशी एकूण 35 लाखांची मदत शासनाच्या वतीने दिली जाईल. तसेच जे जखमी आहे त्यांचा शासनाच्या वतीने योग्य तो वैद्यकीय उपचार केला जाईल. अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी चेंबूर मधील अग्नितांडवात झालेल्या दुर्घटनास्थळी आज भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असून या घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. तसेच अशा घटना पुन्हा राज्यात होऊ नये, यासाठी शासन योग्य ती काळजी घेईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. आग का लागली, कशी लागली या संदर्भात बैठक घेऊन चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. तसेच पीडित कुटुंबाला महिन्याला लागणारी मदतीची आवश्यकता भासल्यास तीही सरकार करेल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
हेही वाचा – विधानसभेसाठी भाजपचा आजपासून महाजनसंपर्क अभियान
पुढे आलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. येथील चाळीत अनेक वन प्लस वन स्ट्रक्चरची घरे आहेत. यापैकी एका घराला अचानक आग लागली. या घरातील कुटुंबीयांना वेळीच आग लागल्याचे लक्षात आले नाही. त्यामुळे एकाच कुटुंबातील 7 जणांचा झोपेत असताना होरपळून मृत्यू झाला. यामध्ये 7 वर्षांच्या एका मुलीचाही समावेश आहे. या सगळ्यांना अग्निशमन दलाने घरातून बाहेर काढून राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पहाटे पाचच्या सुमारास ही आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या, स्थानिक पोलीस पोहचले. सध्या ही आग विझवण्यात आलेली आहे. आगीतील जखमींना तात्काळ राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांना मृत घोषीत करण्यात आले. आज रविवार असल्याने गुप्ता कुंटुंब हे रात्री जेवण करुन गाढ झोपले होते. पहाटे साखरझोपेत असताना अचानक घराला आग लागली. ही आग इतकी भयानक होती, की क्षणार्धात संपूर्ण घराला आगीचा विळखा पडला. त्यामुळे काही कळण्याच्या आतच गुप्ता कुटुंबाच क्षणार्धात होत्याच नव्हतं झाले.
घराच्या मीटर बॉक्समध्ये शॉकसर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यानंतर ही आग घरात पसरत गेली. गुप्ता कुटुंबीय झोपेत असल्याने त्यांना आग लागल्याचे लक्षात आले नाही. त्यामुळे हे संपूर्ण कुटुंब आगीत होरपळून मृत्यूमुखी पडले.