शेअर बाजारातील ५ दिवसांच्या तेजीला अखेर लगाम
![5 day rally in the stock market finally curbed](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/Share-market.jpg)
शेअर बाजारातील पाच दिवसांच्या तेजीला अखेर मंगळवारी लगाम लागला. काल सेन्सेक्स, निफ्टी लाल चिन्हावर बंद झाले. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 709.17 अंकांनी म्हणजेच 1.26 टक्क्यांनी घसरून 55,776.85 वर बंद झाला. तर, निफ्टी 208.30 अंकांनी म्हणजेच 1.23 टक्क्यांनी घसरून 16,663.00 वर बंद झाला.
खरंतर मंगळवारच्या सत्रात बाजारात व्यवहार सुरू होताच सेन्सेक्सने २०० अंकांहून अधिक झेप घेतली होती. मात्र दुपारच्या सत्रात बाजारातील अस्थिर वातावरणामुळे सेन्सेक्सने १,०६७.०७ अंशांच्या घसरणीसह ५५,४१८.९५ पातळीचा तळ गाठला. निर्देशांकात सर्वाधिक वजन राखणाऱ्या रिलायन्स, इन्फोसिस आणि एचडीएफसी बँकेच्या समभागात घसरण झाल्याने काल भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये एक टक्क्याहून अधिक घसरण झाली. तसेच डॉलरच्या तुलनेत रुपयात मंगळवारी ६ पैशांची घसरण होऊन तो ७६.६० रुपयांवर स्थिरावला.
महत्त्वाचे म्हणजे रशियातून नैसर्गिक वायूची आयात रोखण्याबरोबरच नवीन आर्थिक आणि व्यापारी निर्बंध लादण्यात आल्याने जागतिक पातळीवर प्रमुख देशांच्या भांडवली बाजारांमध्ये नकारात्मक पडसाद उमटले आणि मोठ्या प्रमाणावर घसरण झाली.