कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने बीड जिल्ह्यातील ४० शाळा पुन्हा बंद
![The number of new corona victims in the country is below 40,000](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/corona-5174671_1920-1-8.jpg)
बीड – एक महिन्यापूर्वी जिल्ह्यातील ८ वी ते १० वीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या होत्या. मात्र, पुन्हा रुग्ण संख्या वाढत असल्याने सुरू झालेल्या १४० शाळांपैकी ४० शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या आहेत. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
१५ जुलैपासून बीड जिल्ह्यात पहिल्या टप्प्यामध्ये ८० शाळा सुरू झाल्या. त्यानंतर स्थानिक प्रशासनाचे ना हरकत प्रमाणपत्र घेऊन, ३० शाळा सुरू करण्याची परवानगी मिळाली होती. मात्र, आता पुन्हा जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना सुरु झालेल्या शाळा बंद करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. त्यामुळे आता पुन्हा विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचे धडे देण्याची वेळ शिक्षण विभागावर आली आहे. कोरोना परिस्थिती सुधारत असताना शासनाने आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली. त्यामुळे पालकांनी देखील त्यासाठी तयारी दर्शवली होती.सलग शैक्षणिक दुसरे वर्ष ऑनलाइन पद्धतीने होत असल्याने विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय. असे असताना पालकांनी देखील शाळा सुरू करण्यास संमती दर्शवून विद्यार्थ्यांना शाळेत पाठवले, परंतु, पुन्हा कोरोनाची परिस्थिती पाहता भीती व्यक्त केली जात आहे.