G-20 बैठकीसाठी विविध देशांच्या 38 प्रतिनिधींचे पुण्यात आगमन
![38 representatives of various countries arrived in Pune for the G-20 meeting](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/G-20-Pune-780x470.jpg)
पुणेरी, शाल घ़ालून ढोल ताशाच्या गजरात पारंपारिक पद्धतीने स्वागत
पुणे : पुणे येथे १६ व १७ जानेवारी रोजी आयोजित जी-२० बैठकीसाठी विविध देशांच्या प्रतिनिधींचे आज लोहगाव विमानतळावर आगमन झाले. आगमन झालेल्या प्रतिनिधींमधे जी-20 समूहाच्या ऑस्ट्रेलिया, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, नेदरलँड, स्वित्झर्लंड, इंडोनेशिया, स्पेन, सिंगापूर, फ्रान्स, जपान, अर्जेंटिना, जर्मनी या सदस्य देशांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर वित्तीय विकास आणि अर्थव्यवस्थेला स्थिरता देण्यासाठी महत्वाच्या असलेल्या कोएलीशन फॉर डिझास्टर रेझीलीयंट इन्फ्रास्ट्रक्चर, इंटरनॅशनल फायनान्स कार्पोरेशन, युरोपियन युनियन, एशिअन डेव्हलपमेंट बँक या जागतिक संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे.
जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी ओमानच्या प्रॉडक्शन ऑफ सर्व्हिस डिपार्टमेंटचे संचालक सलीम अहमद बाओमर आणि सलीम एम.अलबत्ताशी यांचे संध्याकाळी आगमनप्रसंगी पुणेरी पगडी घालून आणि शाल घालून स्वागत केले.
तत्पूर्वी सकाळी रशियाचे प्रतिनिधी वदीम आन्द्रेवीच टारकीन यांचे, दुपारच्या सत्रात रशियाचे दिमित्री अटापीन आणि ओईसीडीचे कोर्टनी व्हीलर यांचे पुणेरी पगडी घालून आणि शाल घ़ालून ढोल ताशाच्या गजरात आणि तूतारीच्या निनादात पारंपारिक पद्धतीने प्रशासनाच्यावतीने स्वागत करण्यात आले. स्वागतासाठी राजशिष्टाचार विभागाचे उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, पुणे महानगरपालिका उपायुक्त किशोरी शिंदे, विमानतळ संचालक संतोष ढोके, सहायक संचालक संजय दुलारे उपस्थित होते.
बैठकीसाठी येणाऱ्या विविध देशांच्या प्रतिनिधींच्या स्वागतासाठी प्रशासनाने जय्यत तयारी तयारी केली आहे. भरजरी पोशाखात ढोल ताशा वादक, तूतारी वादक पथक ठेवण्यात आले आहे. जी-२० परिषदेसाठी निश्चित करण्यात आलेल्या ‘वसुधैव कुटुंबकम’ या संकल्पनेचे फलक सर्वत्र प्रदर्शित करण्यात आले आहे.