राज्यात अतिवृष्टीमुळे गेल्या चार दिवसांत २०० जणांचा मृत्यू
![State government announces Rs 11,500 crore flood relief in Maharashtra](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/floods.jpg)
मुंबई |
राज्यात २२ ते २४ जुलैदरम्यान कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीतील बळींची संख्या आता २०० वर पोहोचली असून अजूनही २५ लोकांचा शोध लागलेला नाही. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त के ली जात आहे. राज्यात ४८ जण जखमी आहेत. दरड कोसळल्याने तसेच पुरामुळे गेल्या २४ तासांत रायगडमध्ये ३५ लोकांचा मृत्यू झाला असून साताऱ्यात ४ तर वर्धा आणि अकोला जिल्ह्यात प्रत्यकी दोघांचा मृत्यू झाला आहे. कृष्णा नदीला आलेल्या महापुरामुळे सांगली जिल्ह्य़ातील दोन लाख सहा हजार तर पंचगंगा नदीला आलेल्या पुरामुळे कोल्हापूर जिल्ह्य़ातील ५० हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्य़ांत झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठय़ा प्रमाणात जीवित व वित्त हानी झाली आहे. रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्य़ांत पूरपरिस्थिती आता नियंत्रणात आली आहे. दरड कोसळल्याने रायगड जिल्ह्य़ातील तळीये गावातील मदत कार्य थांबविण्यात आले असून बेपत्ता ३५ लोकांना मृत घोषित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पुराचा राज्यातील १०२८ गावांना फटका बसला असून दोन लाख लोक बाधित झाले आहेत तर २९ हजार पशुधनाचे नुकसान झाले आहे. पूरग्रस्त तसेच स्थलांतरित लोकांच्या मदतीसाठी २५९ ठिकाणी मदत के ंद्रे सुरू करण्यात आली असून सात हजार ८३२ तात्पुरती निवारा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.