breaking-newsपुणेमहाराष्ट्र

८७३ मद्यपी वाहनचालक पोलिसांच्या जाळय़ात

नववर्ष साजरे करताना मद्य पिऊन सुसाट वाहने चालविणे महागात!

पुणे : नववर्षांच्या पूर्वसंध्येला वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ८७३ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. शहराच्या वेगवेगळय़ा भागांत पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली.

नववर्षांचे स्वागत करताना अनेक वाहनचालक मद्य पिऊन वाहने चालवितात. मद्य पिऊन वाहने चालविणाऱ्या चालकांमुळे गंभीर स्वरूपाचे अपघात घडतात. या पाश्र्वभूमीवर वाहतूक पोलिसांकडून मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ राबविण्यात आली होती. या कारवाईसाठी वाहतूक पोलिसांकडून शहराच्या वेगवेगळय़ा भागात बंदोबस्त लावण्यात आला होता. लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता, डेक्कन भागातील जंगली महाराज रस्ता, फर्गसन रस्ता, चांदणी चौक, हडपसर येथील अमानोरा मॉल, कोरेगाव पार्क परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. शहर परिसरातील प्रमुख चौकांतील वाहतूक नियंत्रक दिव्यांची (सिग्नल) वेळ वाढविण्यात आली होती.

नववर्षांनिमित्त वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेतील अधिकारी आणि पोलीस कर्मचारी बंदोबस्तात सहभागी झाले होते. मध्यरात्रीपर्यंत मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. श्वास  यंत्रणेच्या साहाय्याने मद्यपी वाहनचालकांची तपासणी करण्यात आली. मद्यपी वाहनचालकांचा वाहन परवाना जप्त करण्यात आला. त्यांच्याविरुद्ध मोटार वाहन अधिनियमांतर्गत खटला दाखल करण्यात आला आहे. सुसाट वेगाने वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. दुचाकीवरून ट्रिपल सीट जाणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यात आली, तसेच वाहतुकीचे नियम धुडकावणाऱ्या  चालकांविरुद्ध कारवाई केली.

नववर्षांच्या रात्री गंभीर अपघात नाही

गेल्या वर्षी नववर्षांच्या रात्री शहरात दोन गंभीर स्वरूपाचे अपघात घडले होते. सुसाट वेगाने वाहने चालविणारे युवक अपघातात मृत्युमुखी पडले होते. यंदा नववर्षांच्या दिवशी गंभीर स्वरूपाचे अपघात घडले नाहीत. मद्यपी वाहनचालकांवर गेल्या आठवडय़ापासून कारवाई करण्यात आली होती. पोलिसांच्या कारवाईमुळे अनेकांनी मद्य पिऊन वाहने चालविणे टाळले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button