हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी उद्यापासून सुनावणी होणार, उज्ज्वल निकम लढवणार खटला
![Hinganghat arson case will be heard from tomorrow, Ujjwal Nikam will fight the case](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/हिंगणघाट-जळीतकांड.jpg)
वर्धा – फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच हिंगणघाट येथे एका प्राध्यापक तरुणीवर पेट्रोल टाकून जाळण्यात आलं होतं. या प्रकरणाची सुनावणी आता उद्यापासून सुरू होणार असून सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांची या खटल्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार, सोमवारी ते हिंगणघाट न्यायालयात युक्तिवाद करण्यासाठी हजर होतील. कोरोनामुळे हा खटला लांबणीवर पडला होता.
हिंगणघाटच्या श्रीमती कुणावार महिला महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाची अर्धवेळ प्राध्यापक असलेली पीडिता 3 फेब्रुवारीला सकाळी आपल्या घरातून बसने हिंगणघाटला आली. आरोपी विकेश नगराळे तिच्या नेहमीच्या मार्गावर दबा धरून बसला होता. ती दिसताच त्याने दुचाकीतील पेट्रोल काढून तिच्यावर ओतले आणि जाळण्याचा प्रयत्न केला. त्यात ही तरुणी ४० टक्के होरपळली. नागपूमधील एका खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र आठवडाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर सोमवारी तिची प्राणज्योत मालवली.
वाचा :-सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आता ‘सावित्री उत्सव’ म्हणून ओळखला जाणार
पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर राज्यभर संताप निर्माण झाला होता. तसेच, आरोपीच्या जीवितेलाही धोका निर्माण झाला होता. त्यामुळेगृहमंत्री अनिल देशमुख यांनी तीन महिन्यांत खटला निकाली काढून आरोपीला शासन करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया खोळंबली होती. पोलिसांनी हिंगणघाटच्या घटनेनंतर अवघ्या 25 दिवसांत म्हणजे 28 फेब्रुवारीला न्यायालयात 426 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. तसचे हा खटला चालवण्यासाठी वर्ध्यात फास्ट ट्रॅक कोर्ट उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, हा अर्ज मंजूर न झाल्याने याप्रकरणाची सुनावणी हिंगणघाट येथे पार पडणार आहे. न्यायालयात आरोपी विक्की नगराळेवर आरोप ठेवण्याची प्रक्रिया उद्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे.
आरोपी विक्की नगराळे हा विवाहित असून त्याला सहा महिन्यांची मुलगी आहे. या घटनेपूर्वी तीन महिन्यांपूर्वी त्याने पीडितेला त्रास दिला होता. याआधी तिचा जुळलेला विवाह तुटल्याने पीडितेच्या वडिलांनी आरोपीला खडसावले होते.
विकेश उर्फ विक्की नगराळे सध्या नागपूर कारागृहात बंदिस्त आहे. या घटनेनंतर राज्यभरात विक्की नगराळेविरुद्ध प्रचंड रोष निर्माण झाला होता. त्यामुळे सुरुवातीच्या काळात वर्ध्यातील कारागृहात पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात होती.
कारागृहात विक्कीवर इतर कैद्याकडून हल्ला होण्याची शक्यता होती. त्यामुळे बॅरेकमधील काही कैद्यांना दुसरीकडे स्थलांतरित केलं आहे. विक्कीला अटक करुन तुरुंगात आणण्यात आलं तेव्हा त्याच्याबरोबर बॅरेकमध्ये 12 ते 15 कैदी होते. मात्र, त्यानंतर या बॅरेकमध्ये केवळ फक्त पाच कैदी ठेवण्यात आले होते.