हवाई सेविकेचा सामूहिक बलात्काराचा आरोप
![प्रजासत्ताक दिनी दिल्लीत महिलेवर सामूहिक बलात्कार; चार जणांना अटक](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/rape-case.jpg)
एमआयडीसी पोलिसांत गुन्हा ; एक अटकेत
खासगी विमान कंपनीत हवाई सेविका असलेल्या तरुणीने बुधवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सामूहिक बलात्काराची तक्रार नोंदवली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून एका तरुणाला अटक केली आहे.
एका विमान कंपनीच्या सुरक्षा विभागात कार्यरत असलेल्या तरुणासह त्याच्यासोबत भाडय़ाच्या खोलीत वास्तव्यास असलेल्या दोन मित्रांनी मद्याच्या अमलाखाली सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार हवाई सेविका असलेल्या तरुणीने केली आहे.
पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. या प्रकरणातील मुख्य आरोपीस अटक करण्यात आली आहे. ४ जूनच्या मध्यरात्री विमानतळावर उतरलेल्या तरुणीने मुख्य आरोपीसोबत मद्यपान केले. मद्य जास्त प्रमाणात घेतल्याने तरुणी स्वत:च्या घरी जाण्याऐवजी आरोपीच्या घरी गेली. तिथे त्याच्या दोन मित्रांपैकी एकाची पत्नीही उपस्थित होती. सकाळी तक्रारदार आणि आरोपीने एकत्र नाश्ताही केला. नाश्ता उरकून घरी गेलेल्या तरुणीने पालकांसोबत पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिल्याची माहिती तपासाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
तरुणीच्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास सुरू आहे. या प्रकरणी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला १० जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. याबाबत सद्यस्थितीत अधिक माहिती देता येणार नाही, असे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नितीन अलकनुरे यांनी सांगितले.