सीएसएमटी, वांद्रे स्थानकांचे वास्तुवैभव जपणार
![Anonymous phone call that a bomb was planted at CSMT, Byculla, Dadar railway station](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/cstm.jpg)
संवर्धनासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात निधीची तरतूद; वस्तुसंग्रहालयातील सुधारणांसाठीही साहाय्य
मुंबई : नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात सीएसएमटी आणि वांद्रे स्थानकाच्या वास्तुवैभवाचे जतन करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. सीएसएमटीच्या संवर्धनाचे कमा सध्या सुरू असून त्यासाठी वाढीव निधीसह वस्तुसंग्रहालय आणि लाकडी सामानासाठीही निधी मंजूर करण्यात आला आहे. वांद्रे स्थानकाच्या संवर्धनासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ म्हणजे सीएसएमटी स्थानक १८८७मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या सुवर्णजयंत्तीनिमित्त बांधण्यात आले. सध्या या स्थानकात १८ फलाट आहेत. जागतिक ऐतिहासिक वारशाचा दर्जा प्राप्त झालेल्या या स्थानकाला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. स्थानकाच्या वास्तूचे सध्या मध्य रेल्वेकडून संवर्धन केले जात आहे. या कामांना आणखी गती मिळावी यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात नऊ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. स्थानकातील लाकडी वस्तू बदलणे, शटर आणि अन्य कामांसाठी पाच कोटी ६१ लाख रुपयांचा स्वतंत्र निधी दिला जाणार आहे.
सीएसएमटीतील रेल्वे मुख्यालयाच्या तळमजल्यावर वस्तुसंग्रहालय आहे. त्याचा कायापालट करण्यासाठी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. या संग्रहालयात मुंबईतील रेल्वेचा इतिहास सांगणारी माहिती, जुनी छायाचित्रे, सीएसएमटीच्या इमारतीचा आराखडा, रेल्वेचे छोटे इंजिन अशा अनेक वस्तू आहेत.
रेल्वे दिल्लीतील राष्ट्रीय रेल्वे वस्तुसंग्रहालयाच्या पाश्र्वभूमीवर सीएसएमटीतील वस्तुसंग्रहालयात बदल करणार आहे. ‘व्हर्च्युअल रिअॅलिटी’चा प्रयोग सीएसएमटीतील संग्रहालयात केला जाणार आहे. मेल-एक्स्प्रेस चालवणारे लोको पायलट किंवा लोकल चालवणारे मोटरमन यांच्या कामाचा अनुभव पर्यटकांना यातून मिळेल. याशिवाय दृक्श्राव्य माध्यमातून रेल्वेचा इतिहास उलगडण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वेवरील वांद्रे या ऐतिहासिक स्थानकाचेही संवर्धन केले जाणार आहे. हे स्थानक २८ नोव्हेंबर १८६४रोजी बांधण्यात आले. त्याचे बांधकाम गॉथिक शैलीतील आहे. वांद्रे स्थानकाच्या फलाट क्रमांक एकला लागूनच (पश्चिमेला) जुन्या वस्तू आहेत. यात जुने छप्पर, त्यावरील नक्षीकाम, नक्षीकाम असलेल्या काचा यासह अनेक वस्तूंचा समावेश आहे. त्यांचे जतन केंद्रीय अर्थसंकल्पातून मिळालेल्या निधीतून केले जाणार आहे. यासाठी आवश्यक असलेल्या १२ कोटी रुपयांपैकी ५ कोटी ६२ लाख रुपये अर्थसंकल्पातून देण्यात आले आहेत.
सल्लागार नेमणार
वांद्रे स्थानकाच्या संवर्धनासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. २०१५ साली तत्कालिन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या स्थानकाचा जागतिक वारसा स्थळात समावेश व्हावा यासाठी प्रयत्न केले होते. त्या दृष्टीने स्थानकाचा विकास केला जाणार आहे. या स्थानकातील फलाट क्रमांक एकला लागूनच असलेल्या काही वास्तूंमध्ये रोषणाई व काही किरकोळ कामे करण्यात आली होती.
सीएसएमटी
* डागडुजीसाठी वाढीव निधी – ९ लाख रुपये
* लाकडी वस्तू बदलण्यासाठी – ५ कोटी ६१ लाख रुपये
* वस्तुसंग्रहालयासाठी – ५० लाख रुपये
वांद्रे
* आवश्यक निधी – १२ कोटी रुपये
* अर्थसंकल्पातील तरतूद – ५ कोटी ६२ लाख रुपये