‘सीएए’ विरोधात महाराष्ट्राचा ‘चाणक्य’ मैदानात, २४ जानेवारीला विशाल रॅली!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/CAA.jpg)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार करणार नेतृत्त्व
महा विकास आघाडीतील सर्व घटक पक्ष, पुरोगामी संघटना होणार सहभागी
मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी
देशभरात सीएए, एनआरसी आणि एनपीआर विरोधात वातावरण पेटले असतानाच आता महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘चाणक्य’ शरद पवारही मैदानात उतरले आहेत. येत्या २४ जानेवारीला केंद्र सरकारचे जनहितविरोधी कायदे आणि केंद्र सरकारच्या हुकूमशाहीविरोधात मुंबईत विशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र विकास आघाडीतील घटक पक्षांसह सर्व डावे पुरोगामी पक्ष आणि संघटना या रॅलीमध्ये सहभागी होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार हे या रॅलीचे नेतृत्व करणार आहेत. कोणत्याही पक्षाचा झेंडा न वापरता तिरंगा झेंडय़ाखाली ‘हम भारत के लोग’ या नावाने हे आंदोलन छेडले जाईल. 24 जानेवारीला दुपारी दादर येथील हुतात्मा बाबू गेनू कामगार स्टेडियमवर या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.