breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

सायकलवरून जगभ्रमंतीचे वेदांगीला वेध

१५ देशांच्या भ्रमंतीचे अनुभव; चौथी महिला जलद स्वार होण्याचा मान

मुंबई : सायकलवरून १५ देशांची भ्रमंती करणाऱ्या वेदांगी कुलकर्णी हिचे पुढील लक्ष्य जगभ्रमंतीचे आहे. या प्रवासाचा पुढचा टप्पा लवकरच सुरू होणार आहे. मुलुंड येथे झालेल्या एका कार्यक्रमात वेदांगीने या मोहिमेची माहिती दिली. तिच्या १५ देशांच्या भ्रमंतीचे अनुभवही तिने या वेळी सांगितले.

पुण्यातील १९ वर्षांच्या वेदांगीने २९ हजार किलोमीटरचा प्रवास सायकलने करत १५ देश पालथे घातले. ही मोहीम तिने अवघ्या १५९ दिवसांत पूर्ण करून जगातील सर्वात कमी वयाची आणि चौथी जलद महिला सायकलस्वार होण्याचा मान पटकावला आहे. महाराष्ट्र सेवा संघ, गिरिमित्र (मुलुंड विभाग) आणि सायकल कट्टा यांच्या विद्यमाने मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघाच्या सभागृहात वेदांगीचा या कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला.

दररोज साधारण ३०० किलोमीटर सायकल प्रवास करणाऱ्या वेदांगीला या मोहिमेत अनेक खडतर आव्हानांचा सामना करावा लागला होता. कॅनडामध्ये तिच्या मागे अस्वल लागले होते. तर रशियामध्ये हिमवृष्टीचा सामना करावा लागला. बर्फोने आच्छादलेल्या रस्त्यावर राहावे लागले होते. ही मोहीम तिच्या जिवावरही बेतली. स्पेनमध्ये तिच्यावर चाकूने हल्ला झाला. तिच्याकडचे सामान हिरावून घेतले गेले.

तीन वेळा तिने मृत्यूला हुलकावणी दिली होती. या संकटात त्या त्या देशातील कुटुंबांची, व्यक्तींची साथ लाभल्याचे तिने सांगितले. वेदांगी तीन वर्षांची असल्यापासून सायकल चालवत आहे. तेच तिचे ध्येय बनले. लांब पल्ल्याची सायकलिंग करू शकतो हा आत्मविश्वास आल्यावर तिने रीतसर प्रशिक्षण घेतले. सराव केला आहे.

स्वत:ला आव्हान देत राहण्याची वृत्ती, आत्मविश्वास आणि स्वत:शी संवाद हेच तुम्हाला तग धरून ठेवण्यासाठी मदत करतात. जगात १९५ देश आहेत मी फक्त १५ पाहिले आहे. त्यामुळे मला खूप फिरायचे आहे. सायकल चालवायची, नवनवीन प्रदेश, तेथील संस्कृती जाणून घ्यायची आहे. लवकरच जगभ्रमंती करायची आहे. लवकरच या मोहिमेवरही निघेन.

– वेदांगी कुलकर्णी

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button