ससूनमधील दहा नर्सेसचे लाक्षणिक उपोषण
पुणे – ससून सर्वोपचार रुग्णालयातील नर्सेसच्या (परिचारिका) बदल्यांबाबत त्या दहा नर्सेसने लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. केलेल्या बदल्या रद्द कराव्या, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू केले असून ससूनमध्ये रूजू करून घेण्याची मागणी केली आहे.
ससूनमधील 10 नर्सेसच्या बदल्या केल्याच्या विरोधात महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशनच्या वतीने संप पुकारण्यात आला होता. यामध्ये ससूनमधील जवळपास 400 नर्सेस सहभागी झाल्या होत्या. मात्र, आता सरकाने या नर्सेसला अत्यावश्यक सेवा कायदा (मेस्मा) लागू केला असल्याने या नर्सेसला संप करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे ज्या नर्सेसची बदली करण्याचे आदेश होते त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत कामावर रूजू करून घेण्याचा आग्रह धरला आहे.
दरम्यान याबाबत बोलताना असोसिएशनच्या अध्यक्षा अनुराधा आठवले म्हणाल्या, ससूनमधील दहा नर्सेसच्या बदल्या करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर त्या बदल्या रद्द करण्याचेही आदेश वैद्यकीय संचालकांकडून काढण्यात आले. मात्र, त्याच दिवशी त्या रद्द करण्याच्या आदेशावर स्थगिती दिल्याचेही आदेश आहेत. या सर्व बदल्यांच्या पत्रांवर वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रविण शिंगारे यांच्या सह्या आहेत. या दहा नर्सेसबाबत अद्याप कोणताही निर्णय न झाल्याने त्यांच्यामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे, असेही आठवले म्हणाल्या. दरम्यान असे उपोषण केल्याने कोणत्याही कायद्याचा भंग केला जात नसून आम्हाला रूजू करून घ्या, अशी मागणी या नर्सेसकडून करण्यात आली आहे. याबाबत शिंगारे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.