सप्तश्रृंगी : रागाच्या भरात पतीने पत्नीला 800 फुट खोल दरीत ढकललं
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/257.jpg)
नाशिक – सप्तशृंगी गडाजवळच्या शिखरावर देवदर्शन करताना वाद झाल्यानंतर संतापाच्या भरात पतीने पत्नीला ८०० फूट खोल दरीत ढकलून दिलं. नाशिक जिल्ह्याच्या काळवण तालुक्यात सोमवारी सकाळी ही घटना घडली. आरोपी बाबूलाल लाखन काळे (२२) घटनास्थळावरुन पळ काढत असताना अन्य भाविकांनी त्याला पकडले.
आरोपी मूळचा मध्य प्रदेशच्या मुरादपूरचा रहिवाशी आहे. काळे आणि त्याची पत्नी कविता रविवारी काळवणमध्ये दाखल झाले. सोमवारी सकाळी दोघेही हॉटेलमधून बाहेर पडले. आधी त्यांनी सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर ते जवळच असलेल्या शीतकडयावर केले. तिथे दोघांमध्ये वाद झाल्यानंतर ११ च्या सुमारास बाबूलाल काळेने कविताला दरीत ढकलून दिले.
बाबूलाल कविताला दरीत ढकलत होता त्यावेळी तिथेच उपस्थित असलेल्या एका फळ व्यापाऱ्याने पाहिले. त्याने आरडाओरडा केल्यानंतर अन्य भाविक तिथे जमा झाले. त्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले अशी माहिती नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक आरती सिंह यांनी दिली.
काळेच्या बहिणीचे कविताच्या भावाबरोबर लग्न झाले आहे. काळेच्या बहिणीचे सतत पतीबरोबर भांडण व्हायचे. वाद झाल्यानंतर ती भावाच्या घरी राहायला यायची. बहिणीचे भावाच्या घरी सतत राहायला येणे कविताला पटत नव्हते त्यावरुन पती-पत्नीमध्ये वाद व्हायचे. ही घटना घडण्यापूर्वी बाबूलाल आणि कविताने पूजेचे साहित्य विकत घेतले होते व काही फोटो सुद्धा काढले होते. याबाबतचे प्रथम वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.