सप्टेंबर अखेरीपर्यंत शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा सरकारचा विचार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/school-bag0.jpg)
कोरोनाच्या जागतिक संकटामुळे गेल्या चार महिन्यांपासून शाळा बंद आहेत. आता देशभरात अनलॉक 3 मध्ये विविध संस्था, आस्थापना सुरू होत आहेत. त्यामुळे शाळा कधी सुरू होणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे. आता सप्टेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याची तयारी सरकारने सुरू केली आहे. मात्र,सप्टेंबर महिन्यात कोरोनाच्या परिस्थितीचा अंदाज घेतल्यावर याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे. राज्य सरकार आणि नागरिकांकडून आलेल्या सूचना आणि तक्रारींचा विचार करून शाळा सुरू करण्याबाबत चर्चा झाली. त्यात शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यावर एकमत झाले आहे. तर प्राथमिक वर्ग ऑनलाइन पद्धतीनेच चालवण्याचा प्रस्तावही चर्चेत आला आहे.
2020-21 या शैक्षणिक वर्षातील अर्धे सत्र संपले आहे. त्यामुळे शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकार आणि जनतेकडून सूचना आणि तक्रारी मागवण्यात आल्या होत्या. त्यात सप्टेंबर अखेरीपर्यंत किंवा ऑक्टोबरमध्ये शाळा सुरू करण्याची सूचना अनेकांनी केली आहे. सध्या ऑनलाइन वर्ग घेण्यात येत आहे. मात्र, पूर्णपणे ऑनलाइन शिक्षण शक्य नसल्याने ऑक्टोबरपर्यंत शाळा सुरू करण्याची गरज अनेकांनी व्यक्त केली आहे. शिक्षण मंत्रालय,आरोग्य मंत्रालय आणि गृहमंत्रालयाने याबाबत मार्गदर्शक सूचना तयार करून शाळा सुरू करण्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. तर राज्यातील परिस्थिती बघून शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा, असाही प्रस्ताव विचारात आहे.
शाळा सुरू झाल्यावर दोन शिफ्टमध्ये विद्यार्थ्यांना बोलावण्यावरही विचार होत आहे. तसेच दोन शिफ्टमध्ये शाळांचे वर्ग सॅनिटाईज करण्यात येणार आहे. मात्र, दोन शिफ्टमध्ये शाळा सुरू झाल्यास शिक्षकांची कमतरता जाणवणार आहे. त्यामुळे शाळांच्या तासिका कमी करण्याचाही विचार करण्यात येत आहे. एक शिफ्ट चार तासांची करण्यावर विचार सुरू आहे. या वेळेत अत्यावश्यक विषय आणि ऑनलाइन शिकवता येणार नाही, असे विषय शिकले जाणार आहेत. तर इतर विषय ऑनलाइन पद्धतीने शिकवण्यावर भर देण्यात येणार आहे. दिवाळीपर्यंत कोरोना आॉोक्यात आल्यास दिवाळीच्या सुटीनंतर पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. तर प्राथमिक वर्ग ऑनलाइन सुरू राहणार असून अद्याप प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबत विचार करण्यात आलेला नाही.