संभाजी भिडेंना मुख्यमंत्र्याचे अभय – प्रकाश आंबेडकरांचा आरोप
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/31Prakash_ambedkar.jpg)
नगर – संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांच्यापेक्षा मनू श्रेष्ठ समजणाऱ्या संभाजी भिडे यांची चौकशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार नाहीत. मुख्यमंत्र्यांचे अभय असल्याशिवाय ते असे बेताल वक्तव्य करणार नाहीत. भिडे यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दंगल घडविण्याचा अजेंडा दिला आहे. दोन समाजांमध्ये दंगल घडविण्याचा प्रयत्न संघ व भाजप करत आहे. दंगल घडवून सत्तेत यायचे हा त्यांचा फंडा आहे, असे आरोप भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत केले.
अॅड. आंबेडकर म्हणाले, “आरएसएस व भागवत संप्रदाय या दोन वेगळ्या विचारधारा आहेत. भागवत संप्रदायातील संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज यांनी माणुसकी टिकविण्यासाठी प्रयत्न केले. भाजप व आरएसएस दंगल घडवून व दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करून सत्ता मिळवू पाहत आहेत. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही कोरेगाव भीमा प्रकरणाची चौकशी जशी झाली नाही, तशीच या प्रकरणातही चौकशी होणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाबाबत विधानसभेत विरोधी पक्ष स्वतःला वाचविण्यासाठी सत्ताधाऱ्यांना लक्ष करत नाहीत.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला मारण्याचा प्रयत्न झाल्याचे खोटे सांगतात. केंद्र सरकार नाटक करते. पंतप्रधानांच्या विरोधात टीका-टिपण्णी झाल्यास कारवाई करण्यात येते. चुकीच्या गोष्टींवर टीका करणे हा संविधानाने दिलेला हक्क आहे. त्यामुळे टीका करणाऱ्यांवर कारवाई होऊ नये, असे आवाहनही आंबेडकर यांनी सरकारला केले.