शॉर्टसर्किटमुळे मगर हॉस्पिटलच्या स्टोअर रूम खाक
![Shocking! Four members of the same family died in a house fire](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/fire-brigade-fire.jpg)
हडपसर – मगरपट्टा मुख्य चौकातील पुणे मनपाच्या अण्णासाहेब मगर हॉस्पिटलच्या स्टोअर रुमला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. ही घटना सायंकाळी सव्वा सातच्या दरम्यान घडली. आगीची माहिती तातडीने अग्निशमन विभागाला कळविल्याने मोठा अनर्थ टळला. या आगीत हॉस्पिटलचे रुग्णाचे केस पेपर व इतर वस्तू जळून खाक झाले. मगरपट्टा चौक हा वर्दळीचा आहे.
या बाजुला पोलीस युनिट 5 चे कार्यालय आहे. या खालील वाहतूक पोलीस कार्यालयात यापूर्वी दोन ते तीनवेळा आगीच्या घटना घडलेल्या होत्या. सांयकाळी मगर हॉस्पिटल बंद झाल्यावर गोडावून रुममधून धुराचे लोट व आग मोठ्या प्रमाणात लागल्याने कर्मचारी भयभीत झाले होते. या आगीत रुममध्ये रुग्णालयाचे जुने साहित्य व केस पेपर जळून खाक झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान तातडीने मगर हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकारी स्नेहल काळे, नगरसेविका हेमलता निलेश मगर यांनी पाहणी केली. आगीच्या घटना घडू नये, यासाठी दक्षता घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.