शेतकरी-आदिवासींचा मुंबईत क्रांती मोर्चा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/morcha-1.jpg)
मुंबई : वनाधिकार कायदा आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, दुष्काळ निवारण, आदिवासी समस्या आणि कर्जमाफी अशा प्रलंबित मागण्यांसाठी शेतकरी आणि आदिवासींनी काढलेला ‘उलगुलान (क्रांती) मोर्चा’ बुधवारी मुंबईच्या वेशीवर धडकला. हे मोर्चेकरी गुरुवारी सकाळी मंत्रालयाच्या दिशेने कूच करणार आहेत.
हिवाळी अधिवेशनाच्या पाश्र्वभूमीवर राज्य सरकारला कोंडीत पकडण्यासाठी शेतकरी आणि आदिवासी पुन्हा मोठय़ा संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत. उन्हाळी अधिवेशनापूर्वी मार्च महिन्यात नाशिकवरून मुंबईत पायी आलेल्या शेतकरी आणि आदिवासी बांधवांच्या मोर्चाने आपल्या मागण्या सरकारसमोर मांडल्या होत्या. मात्र, त्या मागण्यांना न्याय न मिळाल्याने बुधवारी शेतकरी आणि आदिवासी ठाण्याहून मुंबईच्या दिशेने निघाले. हिवाळी अधिवेशनाचे निमित्त साधून हा मोर्चा गुरुवारी मंत्रालयावर धडकणार आहे.
बुधवारी ठाण्यात दाखल झालेले मोर्चेकरी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आले आहेत. ठाणे, पालघर, भुसावळ जिल्ह्य़ातील आदिवासी आणि मराठवाडय़ातील शेतकरी आपल्या प्रलंबित मागण्या घेऊन या मोर्चात सहभागी झाले आहेत. या मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या लोकसंघर्ष मोर्चाने दिलेल्या माहितीनुसार सुमारे १८ जिल्ह्य़ांमधील १२ हजारांहून अधिक आदिवासी-शेतकरी या मोर्चासाठी मुंबईत आले आहेत. आपापल्या जिल्ह्य़ांतून मोर्चेकरी रेल्वे आणि रस्तेमार्गाने बुधवारी ठाण्यात दाखल झाले, तर काही मोर्चेकऱ्यांनी थेट आझाद मैदानात आपले बस्तान बसविले आहे. बुधवारी पहाटे कसारा रेल्वे स्थानकाहून सुमारे आठ ते दहा हजार मोर्चेकरी लोकलने ठाण्याकडे रवाना झाले. त्यानंतर त्यांनी शांतपणे मुंबईच्या दिशेने कूच केली. दुपारच्या दरम्यान सायन येथील सोमय्या मैदानात दाखल झाल्यानंतर मोर्चेकऱ्यांनी रात्री त्या ठिकाणी वस्ती केली. गुरुवारी सकाळी हा मोर्चा मंत्रालयाच्या दिशेने रवाना होणार असल्याची माहिती लोकसंघर्षच्या वतीने देण्यात आली आहे.