शेगाव रेल्वेस्टेशनवर तीन महिलांना रेल्वेने चिरडले
बुलडाणा – शेगावला दर्शनासाठी आलेल्या तीन महिलांचा रेल्वेखाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेत एक महिला गंभीर जखमी झाली आहे. रेल्वे रुळ ओलांडत असताना चेन्नई-जोधपूर या एक्स्प्रेसने त्यांना चिरडले. सरिता विजय साबे (रा. नांदुरा, वय 30), संगीता भानुदास गोळे, (रा. नांदुरा) छंदाबाई तिसरे (वय 45) असे मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत. या महिला अधिकमास आणि एकादशीनिमित्त शेगावला दर्शनासाठी आल्या होत्या.
शेगाव रेल्वे स्थासनकावर नरखेड-भुसावळ पॅसेंजरमध्ये बसण्यासाठी त्या रेल्वे पादचारी पूल वापरण्याऐवजी रेल्वे रुळ ओलाडूंन जात होत्या. याचवेळी समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या एक्स्प्रेसने त्यांना जोराची धडक दिली.
दरम्यान, एसटी संपामुळे जिल्ह्यातील सगळा भार रेल्वे सेवेवर आला होता. त्यामुळे नरखेड-भुसावळ पॅसेंजरमध्ये प्रचंड गर्दी असल्याने या महिलांनी घाई केली आणि त्यांना समोरुन येणारी ट्रेन चुकवता न आल्याने आपले प्राण गमवावे लागले.