शिवसेनेच्या विजयाला भुजबळांची मदत: नरेंद्र दराडे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/narendra-darade1-.jpg)
नाशिक: नाशिक विधान परिषदेत शिवसेनेच्या विजयाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांचीही मदत लाभली, असा खळबळजनक दावा विजयी उमेदवार नरेंद्र दराडे यांनी केला आहे. खरं तर भाजपने राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्यानंतर राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी सहाणे यांचा मार्ग सुकर झाल्याचे बोलले जात होते. मात्र तरीही शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंनी 200 मतांनी विजय मिळवला.
तुरुंगातून सुटल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भुजबळांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. शिवाय पंकज भुजबळही ‘मातोश्री’वर भेटीला गेले होते. महत्वाचे म्हणजे शिवसेनेशी जुने ऋणानुंबध आहे, असे विधान त्यावेळी भुजबळांनी केले होते. याशिवाय नुकतेच शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी भुजबळांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. या सर्व बाबीवरुन भुजबळ आणि शिवसेनेची जवळीक झाल्याचे दिसून येते. त्यामुळे शिवसेनेचे विजयी उमेदवार नरेंद्र दराडे यांनी केलेल्या दाव्यात तथ्य असू शकते, बोलले जात आहे.