शिवसेनेचा ‘एकला चलो रे’चा नारा ?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/uddhav-thackeray.jpg)
मुंबई : यापुढील निवडणूक स्वबळाच्या ताकदीवर लढू असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. पालघर पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवेसना भवनात पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी बोलताना त्यांनी भाजपासहित निवडणूक आयोगावरही ताशेरे ओढले.
पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला उद्धव ठाकरे यांनी पांडुरंग फुंडकरांना श्रद्धांजली वाहिली. २०१४ मध्ये पुढील २५ वर्ष हे सरकार जाणार नाही असं वातावरण निर्माण करण्यात आलं होतं. मात्र पोटनिवडणुकांचे निकाल पाहता यांनी बहुमत गमावलं आहे हे स्पष्ट दिसतंय असे उद्धव ठाकरे म्हणाले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शिवरायांचा अपमान केला असतानाही त्यांचा उमेदवार विजयी झाला याचं दुख: असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं.
निवडणूक आयोगावर टीका करताना निवडणूक आयोग म्हणजे नुसतं बुजगावणं आहे का ? असा सवाल त्यांनी विचारला. एकीकडे मतदान करण्याचं आवाहन केलं जातं आणि दुसरीकडे मशीन खराब होतात, नावं नसतात. सर्व पक्षांनी मिळून निवडणूक आयुक्तांविरोधात करप्ट सिस्टीम अंतर्गत केस केली पाहिजे असंही ते म्हणाले.