शिकारी कुत्रे करणार मुंबईतील महत्वाच्या इमारतींची सुरक्षा
मुंबई :- मुंबई पोलिसांच्या ताफ्यात लवकरच विशेष प्रशिक्षित शिकारी कुत्र्यांच्या पथकाचा समावेश होणार आहे. या शिकारी कुत्र्यांकडे मुंबईतील महत्वाच्या इमारतींच्या संरक्षणाची जबाबदारी असेल. आपल्या वास घेण्याच्या क्षमतेद्वारे संशयास्पद दिसणारी वस्तू हुडकून काढणे तसेर गरज पडल्यास समोरच्यावर हल्ला करण्याचे प्रशिक्षण या कुत्र्यांना देण्यात येईल असे पोलीस दलातील सूत्रांनी सांगितले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.
पोलीस सध्या स्फोटके, अंमली पदार्थ शोधणे आणि फरार गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी कुत्र्यांचा वापर करतात. मुंबईच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून महत्वाच्या असलेल्या २० पेक्षा जास्त इमारतींमध्ये या शिकारी कुत्र्यांना तैनात केले जाईल. मंत्रालय, राजभवन, मुख्यमंत्र्यांचा बंगला, बीएआरसी आणि अन्य महत्वाच्या इमारतींमध्ये या शिकारी कुत्र्यांच्या पथकाला तैनात केले जाईल.
वास घेऊन संशयास्पद वस्तू हुडकून काढण्याबरोबरच प्रसंगी हल्ला करण्याचेही या कुत्र्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. लॅब्राडोर, जर्मन शेपर्ड आणि रॉटविलर हे कुत्रे या पथकामध्ये असतील. या कुत्र्यांच्या पथकाला अजून नाव दिलेले नसून त्यांना फक्त एकाच जागी तैनात करण्यात येणार नाही. हे कुत्रे सकाळी एका ठिकाणी नंतर दुसऱ्या ठिकाणी डयुटी बजावतील असे सूत्रांनी सांगितले.