breaking-newsपुणेमहाराष्ट्र

वेळ सांगून येत नाही; वाहतुकीचे नियम पाळा!

६२५ बेशिस्त वाहनचालकांचे पोलिसांकडून समुपदेशन

पुणे शहरात वाहतुकीच्या नियमभंगाचे प्रमाण वाढते आहे. नियम धुडकावणाच्या वृत्तीमुळे गंभीर तसेच किरकोळ स्वरूपाचे अपघात घडण्याचे प्रमाण अन्य शहरांच्या तुलनेत जास्त आहे. बेशिस्त वाहनचालकांवर फक्त दंडात्मक कारवाई करण्यापेक्षा त्यांचे वाहतूक नियमांबाबत समुपदेशन करा, अशा सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक समितीकडून देण्यात आल्या आहेत. पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांचे समुपदेशन करण्यास सुरुवात झाली आहे. पोलीस मुख्यालयात पार पडलेल्या समुपदेशन वर्गात शुक्रवारी ६२५ बेशिस्त वाहनचालकांचे वाहतूक नियम आणि सुरक्षेबाबत समुपदेशन करण्यात आले.

शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांचे समुपदेशन करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वाहतूक नियमांचे पालन तसेच वाहनचालकांच्या मानसिकतेबाबत या प्रसंगी मनोविकारोज्ज्ञ डॉ. रोहन जहागिरदार यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. डॉ. जहागिरदार यांनी वाहनचालकांशी संवाद साधून त्यांचे प्रबोधन केले. प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी बाबासाहेब आजरी, वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते, कनीज सुखराणी, कल्याण रमण वेंकटेश आणि समुपदेशन वर्गाचे समन्वयक पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक आदी या प्रसंगी उपस्थित होते.

डॉ. जहागिरदार यांनी नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांशी संवाद साधला. अपघाताची वेळ सांगून येत नाही. नियम पाळल्यास अपघाताची तीव्रता कमी होऊ शकते. मोटारचालकांनी आसनपट्टा परिधान करण्याची गरज आहे, तसेच दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान करावे, असे आवाहन त्यांनी केले.

या बाबत पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक म्हणाले, पोलीस मुख्यालयात पार पडलेल्या समुपदेशन वर्गात ६२५ वाहनचालक सहभागी झाले होते. नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांशी पोलिसांनी संवाद साधला. पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांच्या सूचनेनुसार यापुढील काळात नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. रस्ते अपघातात मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण जास्त आहे.

..नंतर दंड

बेशिस्त वाहनचालकांचे प्रथम समुपदेशन करण्याची गरज आहे. त्यानंतर त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात यावा, अशा सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. समुपदेशन झाल्यानंतर नियमभंग करणाऱ्या वाहनचालकाकडून दंड वसूल करून त्याला वाहन परवाना परत करण्यात येईल. या पुढील काळात पोलिसांकडून आठवडय़ातून एकदा समुपदेशन वर्गाचे आयोजन केले जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button